Voice of Eastern

नवी दिल्ली :

महाराष्ट्राचे सुपूत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (पीवीएसएम, एवीएसएम, वीएसएम) यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाल्यानंतर मनोज पांडे यांनी त्यांच्याकडून लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.

लेफ्टनंट जनरल पांडे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर १९८२ मध्ये ते कोअर ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्त झाले. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील पल्लनवाला क्षेत्रात ‘ऑपरेशन पराक्रम’दरम्यान त्यांनी जनरल ऑफिसर म्हणून इंजिनीअर रेजिमेंटचे नेतृत्व केले. युनायटेड किंगडममधील कॅम्बरलीचे पदवीधर आहेत. त्यांनी हायर कमांड (एचसी) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी) मध्ये शिक्षण घेतलेले आहे.

लष्करातील ३९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध जबाबदार्‍या पार पाडताना महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक पदांवर काम केले आहे. यामध्ये पश्चिम लद्दाखच्या उंचावरील माउंटन विभाग, वेस्टर्न थिएटरमधील स्ट्राइक कोरच्या इंजिनिअर ब्रिगेड कमांड, ईशान्येतील कॉअर, कमांडर-इन-चीफ अंदमान आणि निकोबार कमांड (CINCAN), जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ तसेच दक्षिण कमांडचे चीफ-ऑफ-स्टाफ अशा महत्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला आहे. पांडे यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, तसेच लष्करप्रमुखांकडून आणि जीओसी-इन-सी ( GOC-in-C) कडून उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे.

Related posts

मंकी पॉक्ससाठी राज्य सरकारचा आरोग्य विभाग अलर्ट

अनाथांची माय हरपली; सिंधुताई सपकाळ यांचे निधन

Voice of Eastern

कल्याण-डोंबिवलीतील स्मार्ट सिटी प्रकल्पावरील कोट्यवधी रुपये पाण्यात

Voice of Eastern

Leave a Comment