मुंबई :
मुंबई महापालिकेच्या आरोग्यविभागकडून ३० जानेवारी ते १४ फेब्रुवारी या १५ दिवसांत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांर्तगत ‘स्पर्श कुष्ठरोग मोहीम’ राबविण्यात येणार आहे. या मोहीमेंतर्गत महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये प्रदर्शने, शालेय व महाविद्यालयीन स्तरावर शपथ घेणे, विविध ठिकाणी पथनाट्य, तपासणी शिबिर आदी जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत.
कुष्ठरोगाबाबत जनमानसात असलेल्या गैरसमजूती दूर करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २०१८-१९ पासून ‘स्पर्श कुष्ठरोग मोहीम’ राबविण्यात येते. या अंतर्गत कुष्ठरोग क्षेत्रात काम करणारे आरोग्य कर्मचार्यांच्या मार्फत प्रदर्शने, व्याख्याने, हस्तपत्रिका वाटप, पथनाटय इत्यादी माध्यमांतून कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय माहिती देण्यात येते. मुंबईमध्ये ३० जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘आजादी का अमृत महोत्सव’अंतर्गत २०२१-२२ साठी यंदाच्या मोहिमेचे ‘कुष्ठरोगमुक्तीकडे वाटचाल’ हे घोषवाक्य आहे. कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने प्रभावी वाटचाल करण्यासाठी महापालिका क्षेत्रामध्ये कुष्ठरोग क्षेत्रात काम करणार्या सामाजिक संस्था, राज्यशासन यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीस वेळेत योग्य औषधोपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. यासाठी बाधित व्यक्तींची वेळेत व लवकर तपासणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे कुष्ठरोग शोध मोहीम व सक्रिय कुष्ठरोग शोध व नियमित नियंत्रण मोहीमेंतर्गत घरोघर भेटी देऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे घरी येणार्या पालिका कर्मचारी तसेच प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले.