मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाल्याने ते शाळाबाह्य झाले आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी बृहन्मुंबई शिक्षणाधिकारी कार्यालय आणि उपसंचालक कार्यालयामार्फत ४ ते १५ मार्चदरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवण्यात येणार आहे.
३ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांचा शोध घेण्यासाठी गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्टेशन, बस स्थानके, बाजार वीटभट्ट्या, मोठी बांधकामे, स्थलांतरीत कुटुंबे, झोपड्या, पदपथ, सिग्नल किंवा रेल्वेमध्ये विविध वस्तू विकणारी तसेच भीक मागणारी बालके, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, भटक्या जमाती, बालमजूर इत्यादी ठिकाणी बालकांची शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी ४ ते १५ मार्चदरम्यान विशेष शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. बृहन्मुंबई शिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारित असणारे शिक्षण निरीक्षक दक्षिण/उत्तर व पश्चिम विभगातील सर्व विषयतज्ज्ञ, समावेशित शिक्षण विशेषतज्ज्ञ, विशेष शिक्षक, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांच्या सहाय्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे.