मुंबई :
सकाळी उठल्यानंतर तुम्ही प्रथम तुमचा मोबाइल घेऊन सर्व सोशल मीडिया अॅप्स पाहता. ऑनलाइन शिक्षण किंवा कामानिमित्त तुम्ही अनेक तास लॅपटॉपवर वेळ व्यतित करता आणि दरम्यानच्या काळात फक्त एकदा किंवा दोनदा ब्रेक घेता. रात्रीच्या वेळी मनोरंजनासाठी तुम्ही पुन्हा एकदा मोबाइल किंवा लॅपटॉप घेऊन ओटीटी व्यासपीठांवरील शोज पाहता किंवा ऑनलाइन रील्स व व्हिडिओज पाहता. हे अगदी ओळखीचे वाटते ना? हा तुमचा नित्यक्रम असेल तर आत्ताच थांबा, याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
अमेरिकन स्ट्रोक असोसिएशनच्या स्ट्रोक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या २०२१ संशोधनातून निदर्शनास आले की, स्क्रीनवर अधिक वेळ व्यतित करणार्या, तसेच बैठेकाम जीवनशैली असलेल्या ६० वर्षांखालील प्रौढ व्यक्तींना शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत स्ट्रोकचा धोका आहे. वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएसओ) मधील डेटा निदर्शनास आणतो की, चारपैकी एका व्यक्तीला त्यांच्या जीवनकाळामध्ये स्ट्रोक अॅटॅक आला असावा. दि लॅन्सेण्ट ग्लोबल हेल्थने नुकतेच केलेल्या संशोधनाच्या मते, भारतातील असंसर्गजन्य न्यूरोलॉजिकल आजारांचे प्रमाण १९९० मधील ४.० टक्क्यांवरून २०१९ मध्ये ८.२ टक्क्यांपर्यंत दुप्पट झाले आणि या आजारांमध्ये स्ट्रोक अग्रस्थानी आहे. दरवर्षी भारतातील १.८ दशलक्ष व्यक्तींना स्ट्रोक येतो. तसेच हा मृत्यू व अपंगत्वासाठी पाचवा प्रमुख कारणीभूत आजार आहे.
स्क्रीनवर अधिक वेळ आणि स्ट्रोक : यूएस संशोधनामधून निदर्शनास आले की, डिजिटल स्क्रीनवर व्यतित केलेल्या दर एका तासामुळे व्यक्तीची जीवनमर्यादा जवळपास २२ मिनिटांनी कमी होते. यामुळे व्यक्तीला स्ट्रोक आणि विविध हृदयविषयक आजार, कर्करोग इत्यादींचा धोका निर्माण होतो. आणखी एका युएसमधील संशोधनातून निदर्शनास आले की डिजिटल स्क्रीन्सवर (लॅपटॉप, टीव्ही, मोबाइल इत्यादी) सतत २ तास व्यतित केल्याने स्ट्रोकचा धोका लक्षणीयरित्या वाढला. दोन तासांपेक्षा अधिक वेळ मोबाइल मनोरंजनाचे व्यसन जडले असेल तर स्ट्रोकचा धोका २० टक्क्यांनी वाढतो. म्हणूनच बैठेकाम करण्याची जीवनशैली आणि स्क्रीनवरील अमर्यादित वेळ हे स्ट्रोकसाठी प्रमुख धोकादायक घटक आहेत.
तरूणांमध्ये स्ट्रोकचे वाढते प्रमाण : महामारीमुळे आपण अशा स्थितीमध्ये अडकलो आहोत की, बहुतांश श्रमजीवी प्रौढ व्यक्ती व मुलांना कामासाठी किंवा शिक्षणासाठी दीर्घकाळापर्यंत स्क्रीन्ससमोर बसून राहणे आवश्यक आहे. सद्यस्थितीमध्ये आपण आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तरूण पिढी सतत मोबाइलवर असते, या सर्व बाबींमुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. स्क्रन्समधून उत्सर्जित होणारी ब्ल्यू किरणे मेलाटोनिन निर्मिती कमी करते (झोपणे व उठणे या चक्रावरील नियंत्रण – सर्काडियन रिदमशी संयोजित रात्रीच्या वेळी उत्सर्जित होणारे हार्मोन), ज्यामुळे वेळेवर झोपून लवकर उठणे अवघड होऊन जाते. अशाप्रकारची जीवनशैली जगत असल्यामुळे व्यक्तीला लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविषयक आजार इत्यादींसारख्या इतर आजारांचा धोका देखील होतो. हे सर्व आजार एकमेकांशी संलग्न आहेत:
मधुमेह असलेल्या व्यक्तीला स्ट्रोक होण्याचा धोका दुप्पट आहे, कारण अकार्यरत रक्तवाहिन्यांमुळे इस्केमिक स्ट्रोकची सुरूवात लवकर होते (रक्ताच्या गाठी झाल्यामुळे रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो किंवा मेंदूतील धमनी अरूंद झाल्याने हा आजार होतो).
उच्च एलडीएलमुळे (खराब कोलेस्ट्रॉल पातळी) धमन्यांमध्ये प्लाक निर्माण होण्यास सुरूवात होते, ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही आणि स्ट्रोक येतो. उच्च रक्तदाब हा जवळपास ५० टक्के इस्केमिक स्ट्रोक्ससाठी प्रमुख कारण आहे आणि यामुळे हॅमरेजिक स्ट्रोकचा (मेंदूमध्ये रक्तस्त्राव) धोका वाढतो.
जीवनशैलीमध्ये हे बदल करा :
- आपल्या शारीरिक निष्क्रियतेचे दुष्परिणाम टाळण्यासाठी दररोज एक तास चालणे आवश्यक आहे.
- दररोज ३० मिनिटे व्यायाम करा आणि मुलांना देखील ही सवय लावा.
- स्क्रीनवर व्यतित केला जाणारा वेळ कमी करा आणि लॅपटॉपसमोर बसून काम करावे लागत असेल तर वारंवार कामामधून ब्रेक घ्या.
- स्ट्रोक हा उपचार करता येऊ शकणारा आजार आहे, म्हणून सहा तासांच्या योग्य कालावधीमध्ये त्वरित कृती करण्यासाठी FAST दृष्टीकोन (चेहरा पडणे, हात कमकुवत होणे, बोलताना अडखळणे, रूग्णवाहिकेला बोलावण्याची वेळ) लक्षात ठेवा.