मुंबई :
मुंबई महापालिका शिक्षण खात्याचा २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार ३७० कोटी २४ लाख रुपये आकारमान असलेला अर्थसंकल्प सहआयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला. यावेळी मुंबई महापालिकेने शालेय अभ्यासक्रमातील एखादी संकल्पना स्पष्ट व्हावी व त्यांना ती लवकर समजावी यासाठी शाळांमध्ये आता बोलक्या संरक्षक भिंती उभारण्यात येणार आहेत, त्यासाठी अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील एखादी संकल्पना स्पष्ट करित असताना त्या आशयाचे चित्र दाखविले असता ती संकल्पना लवकर समजते. त्यामुळे शालेय इमारतीमधील संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूस विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारीचे संदेश देणारे तसेच शैक्षणिक चित्र रेखाटण्यात येणार आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट दाखवल्याने त्यांची आकलन व अध्ययन क्षमता वाढेल व त्यांना तो विषय समजण्यास अधिक मदत होईल. या उपक्रमामुळे शालेय इमारत व परिसर सुशोभित होईल. शाळांतील रंगकामामुळे स्वच्छता राखून शैक्षणिक वातावरणही चांगले होण्यास मदत होईल. यासाठी अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी टॅब देण्यात येणार असून त्यासाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.