मुंबई :
देशातील बहुसंख्य हिंदू पंडितांवर अनेकदा अन्याय झाला आहे. हे धडधडीत सत्य मांडणारा ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या मोफत प्रदर्शनाला शुक्रवारी दादरमधील नागरिकांनी तुफान गर्दी केली. दादरमधील नक्षत्र सिनेमागृहात या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन भाजपचे मुंबई प्रदेश सचिव सचिन शिंदे यांनी आयोजित केले होते. यावेळी भाजप आमदार कालिदास कोळंबकर, सिने-नाट्य अभिनेते संजय मोने यांनी हजेरी लावली.
काश्मीरमधील हिंदू पंडितांवर तीन दशकांपूर्वी झालेल्या अनन्वित अत्याचाराची, नरसंहाराची वास्तव कहाणी ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे. चित्रपटातील प्रत्येक घटना आणि प्रसंग हे अंगावर येत असून, हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याच बांधवांवर झालेल्या अत्याचारामुळे आपण पेटून उठलेले असतो किंवा आपले मन खिन्न झालेले असते. या चित्रपटाबद्दल लोकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात येत असला तरी हिंदू पंडितांवर झालेला अन्याय आणि अत्याचार याचे भीषण वास्तव या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. त्यामुळेच हा चित्रपट प्रत्येक नागरिकांनी बघितलाच पाहिजे, असे ठाम मत भाजप मुंबई प्रदेश सचिव सचिन शिंदे यांनी मांडले. आपल्या दादर विभागातील नागरिकांनी हा चित्रपट बघितलाच पाहिजे यासाठी या चित्रपटाचा विशेष शो दादरमधील नक्षत्र सिनेमागृहात शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस आयोजित केला आहे. नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहून मला आनंद झाला असून, मी त्यांचा आभारी असल्याचे सचिन शिंदे यांनी सांगितले.