Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

एसटी सहकारी बँक कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे

banner

मुंबई :

एसटी सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचा संप गेल्या महिन्याभरापासून सुरू असून या संपाची कोंडी काही केल्या फुटत नव्हती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेत बँकेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्यात मध्यस्थी करण्याचे मान्य केले. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी सहकारी बँकेच्या संपाची सद्यस्थिती मांडण्यासाठी को-ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि या संघटनेचे सल्लागार, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी एसटी सहकारी बँकेमध्ये ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे संचालक मंडळ काम करू लागल्यापासून सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि बँकिंग नियमन कायद्याला हरताळ फासत मनमानी कारभार सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा चुकीचा कारभार पाहता बँकेतील २२५ कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढून घेतल्या आहेत. याचा परिणाम म्हणून बँकेला ५४ कोटींचा तोटा होऊ शकतो आणि याची कोणतीही जबाबदारी संचालक मंडळ घ्यायला तयार नसल्याचे मत अडसूळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडले.

संचालक मंडळाने कारभार स्वीकारल्यानंतर अनेक निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतले. त्यांनी घेतलेले हे निर्णय बँकेचे अधिकारी मानायला तयार नसल्याने आजमितीस बँकेचे कार्यकारी संचालक आणि सहव्यवस्थापक यांनी बँकेत येणे बंद केले आहे. तसेच आधीच्या संघटनेतील नेत्यांच्या मुलांना निलंबित करणे, त्याना सहकार्य केलेल्या कर्मचाऱ्यांची अडनिड्या ठिकाणी बदल्या करणे सुरू केल्याने अखेर ही दहशत मोडून काढण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना संप करावा लागल्याचे त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे नीट ऐकून घेत बँक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि बँकेच्या भविष्यासाठी संप करणे योग्य नसून या वादात आपण स्वतः मध्यस्थी करू असे मान्य केले, मात्र त्यापूर्वी हा संप मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रश्नात लक्ष घालून तो सोडवण्याचे मान्य केल्यामुळे तसेच बँकेचे पदाधिकारी आणि सभासद यांचे नुकसान टाळण्यासाठी हा संप तूर्तास मागे घेण्याचा निर्णय को-ऑपरेटिव्ह बँक युनियनचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी जाहीर केला. यावेळी या संघटनेचे सल्लागार, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ हेदेखील सोबत उपस्थित होते.

Related posts

हाताच्या तुटलेल्या अंगठ्याच्या जागेवर बसवला पायाचा अंगठा

MOGS ची ५१ वी वार्षिक परिषद उत्साहात; जगभरातून ८५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी

Voice of Eastern

महाविकास आघाडीची आजही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Leave a Comment