मुंबई :
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने सोलापूर अॅम्यूचर खो-खो असोसिएशन व सोलापूर कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा यांच्या संयक्त विद्यमाने २०२२-२३ च्या राज्य पंच शिबिराचे आयोजन २८ व २९ मे रोजी सोलापूर येथील नूतन मराठी विद्यालयात केले आहे.
जे पंच राज्य पंच शिबिराला उपस्थित राहतील अशाच पंचाना पुढील स्पर्धासाठी नियुक्ती देण्यात येणार आहे. तसेच या शिबिरात सहभागी सर्व पंचांनी दोन्ही दिवशी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सर्व जिल्ह्यातील राज्य पंच परीक्षा उत्तीर्ण असलेल्या पंचांनी या शिबिरात उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, सचिव गोविंद शर्मा, फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. अरुण देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी, राज्याचे माजी सचिव संदिप तावडे यांनी केले आहे.
शिबिरार्थींनी २८ मे रोजी सकाळी ८ वाजता नूतन मराठी विद्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. शिबीरासाठी उपस्थित राहणार्या सर्व पंचांनी २० मेपर्यंत राज्य खो-खो असोसिएशनच्या सांकेतिक स्थळावर परिपत्रक या सदरात दिलेल्या लिंकवर प्रवेश अर्ज भरणे बंधनकारक आहे, असेही गोविंद शर्मा यांनी सांगितले आहे. या शिबिरात एकूण चार सत्रे होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.