मुंबई :
मुलांमध्ये विज्ञानाची रुची वाढवणे आणि शालेय जीवनापासूनच त्यांच्यामध्ये विज्ञान संशोधनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेच्या राज्यस्तरीय फेरीचे यजमान पद यंदा मुंबईला मिळाले आहे. राज्य विज्ञान परिषद ८ आणि ९ जानेवारीला मुंबईतील ६ केंद्रांवर होणार आहे.
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाला संपूर्ण देशात जुलैमध्ये शिक्षक प्रशिक्षणाने सुरुवात होते. यावर्षी राज्यभरातून सुमारे ४५०० प्रकल्पांची विक्रमी नोंद झाली होती. जिल्हा स्तरावर सुमारे ९००० विद्यार्थी व ४५०० विज्ञान शिक्षक यात सहभागी झाले होते. महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या जिल्हास्तरीय फेरीत ३५ जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक जिल्ह्यातील निवडक असे २६८ प्रकल्प राज्य पूर्व चाळणी परीक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे काटेकोर परीक्षण करून त्यापैकी १०३ प्रकल्पांची निवड राज्यस्तरासाठी झाली. यातून ३० उत्कृष्ट प्रकल्पांची निवड राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येणार आहे. असे या उपक्रमाचे राज्य समन्वयक जिज्ञासा ट्रस्ट ठाणे या संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी सांगितले.
मुंबईमध्ये ही परिषद दहिसरमधील व्ही.पी.एम. विद्या मंदिर, कुर्ल्यातील विवेकानंद इंग्लिश स्कूल आणि मालाडमधील चारकोप येथील श्री एकविरा विद्या मंदिर या तीन शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक शाळेत दोन केंद्र अशी ६ केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. यावेळी बाल वैज्ञानिकांचे ’शाश्वत जीवनासाठी विज्ञान’ या विषयांवरील संशोधन सादर केले जाणार आहे. सर्व ठिकाणी एकाच वेळी प्रकल्प सादरीकरण सुरू होईल.
राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेच्या उदघाटनासाठी टीआयएफआरचे माजी संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव अ.पा. देशपांडे आणि होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचे नरेंद्र देशमुख, शालेय शिक्षण विभाग पश्चिम मुंबईचे शिक्षण निरीक्षक डॉ. नितीन बच्छाव तसेच सुरेंद्र दिघे, विश्वास कोरडे, नंदकुमार कासार आणि बाळासाहेब जाधव हे उपस्थित राहणार असल्याचे या उपक्रमाचे मुंबई प्रमुख आणि नवनिर्माण विज्ञान प्रबोधनचे अध्यक्ष बी बी जाधव यांनी सांगितले.