मुंबई :
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड व्हावी, त्यांनी यूपीएससी, एमपीएससी प्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने मुंबई महापालिकेकडून दरवर्षी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये विद्यार्थी पाठवले जातात. ऑलिम्पियाडसाठी यंदा अडीच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी जोरदार तयारी करत आहेत. या स्पर्धेची शहर स्तरावरील फेरी २६ फेब्रुवारीला होणार असून, त्यामध्ये निवड होणारे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
२०१७-१८ पासून दरवर्षी मुंबई महापालिकेमधील विद्यार्थ्यांसाठी केंब्रिज विद्यापीठाकडून ऑलिम्पियाड परीक्षेचे आयोजन केले जाते. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर होत असल्याने या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांचा कस लागतो. ऑलिम्पियाड परीक्षा तिसरी ते आठवीचे विद्यार्थ्यांनाच देता येते. ही परीक्षा इंग्रजी, गणित व विज्ञान या तीन विषयांची घेतली जाते. या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणार्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदकाने गौरवण्यात येते. तसेच उल्लेखनीय यश मिळवणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात कोठेही कमी पडू नयेत यासाठी मुंबई महापालिकेने २०१७-१८ पासून विद्यार्थ्यांनकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न असलेल्या फायर फिश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करार केला.
गतवर्षी कोरोनामुळे या परीक्षेमध्ये मुंबई महापालिकेचे विद्यार्थी सहभागी होऊ शकले नसले तरी यावर्षी २५४७ विद्यार्थी शहर स्तरावरील परीक्षेत सहभागी होणार आहे. विद्यार्थ्यांना गणिताचा भिती वाटते असे साधारणपणे म्हटले जाते. पण या परीक्षेत मुंबई महपालिकेतील विद्यार्थ्यांनी गणित विषयामध्येच सर्वाधिक नोंदणी केली आहे. पालिकेच्या १०७० विद्यार्थी गणित विषयासाठी नोंदणी केली आहे. त्याखालोखाल इंग्रजी ७५७ आणि विज्ञान ७२० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. महापालिकेचे उपशिक्षणाधिकारी इंदरसिंग कडाकोट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांकडून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येत आहे. सध्या मुंबई महापालिकेकडून विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.
अशी होते विद्यार्थ्यांची निवड
ऑलिम्पियाड परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची प्रथम नोंदणी करून त्यांची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यावेळी प्रवेश परीक्षेसाठी १९ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सर्व साहित्य महापालिकेकडून पुरवण्यात येते. इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेत ८८ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणे अपेक्षित आहे. इयत्ता ६ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक तर इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवणे अपेक्षित असते. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांनी शहर स्तरासाठी निवड होते. त्यातून राष्ट्रीय स्तरावरील अंतिम परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड होते. या परीक्षेला महापालिकेच्या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई या तिन्ही बोर्डाचे विद्यार्थी सहभागी होतात. अशी माहिती मुंबई महापालिकेचे प्रभारी शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.