मुंबई :
महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाने एक नवे पाऊल उचलले आहे. यामुळे एसएनडीटी विद्यापीठातून शिक्षण घेणार्या विद्यार्थीनींना आता विद्यापीठाकडूनच परदेशी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर परदेशी विद्यापीठातील कौशल्याधारित विविध अभ्यासक्रम विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थीनी आता अधिक सक्षम होण्याची शक्यता आहे.
चूल आणि मूल या फेर्यात अडकलेल्या महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सुरू झालेले एसएनडीटी महिला विद्यापीठ विविध अभ्यासक्रम राबवत महिलांना सक्षम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. मात्र आता विद्यापीठाने महिलांना परदेशातील उच्च व कौशल्याधारित शिक्षण मिळावे यासाठी नवे पाऊल उचलले आहे. उच्च शिक्षणासाठी मुलींना परदेशात पाठवताना अनेक पालकांना मुलींच्या सुरक्षेची तसेच आर्थिक समस्या भेडसावत असतात. या बाबींचा गांभीर्याने विचार करून एसएनडीटी विद्यापीठातून शिक्षण घेणार्या विद्यार्थींनीना परदेशातील शिक्षण घेणे सोयीस्कर ठरावे, यासाठी एसएनडीटी विद्यापीठाकडून अमेरिकेतील बीएमसीसी आणि सीयूएनवाय या विद्यापीठांसोबत करार करण्यात येत आहे. बीएमसीसीचे अध्यक्ष डॉ. अँथनी मुनरो व उपाध्यक्ष संजय रामदथ आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामध्ये बुधवारी राजभवन येथे करार करण्यात येणार आहे. या करारानुसार एसएनडीटी विद्यापीठातील विद्यार्थींना या विद्यापीठामध्ये उच्च व कौशल्याधारित शिक्षण घेण्यासाठी जाता येणार आहे. या शिक्षणादरम्यान विद्यार्थींनींची सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी ही त्या विद्यापीठांवर असणार आहे. तसेच परदेशातील शिक्षणाचा खर्चाचा भार कमी करण्यासाठी या विद्यार्थींनींना शिक्षणाच्या कालावधीमध्ये नोकरी मिळवून देण्याची हमीही या विद्यापीठाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थींनीचा परदेशी शिक्षण सहज सोपे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एसएनडीटी विद्यापीठातील विद्यार्थीनी ज्याप्रमाणे परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणार आहेत. त्याचप्रमाणे या विद्यापीठातील विद्यार्थीनीही एसएनडीटी विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी येणार आहेत. तसेच एसएनडीटी विद्यापीठातील शिक्षकही प्रशिक्षणासाठी या विद्यापीठामध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे बीएमसीसी, सीयूएनवाय आणि एसएनडीटी विद्यापीठातील करारानुसार भविष्यात महिलांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी दिली.
अभ्यासक्रमांची होणार देवाणघेवाण
शिक्षणासाठी विद्यार्थीनी व प्रशिक्षणासाठी शिक्षकांना बीएमसीसी, सीयूएनवाय विद्यापीठामध्ये पाठवण्याबरोबरच या विद्यापीठांमधील अभ्यासक्रम एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एसएनडीटी विद्यापीठातील अभ्यासक्रमसुद्धा या विद्यापीठांशी सलंग्न महाविद्यालयांमध्ये शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे परदेशातील अनेक अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थींनीना एसएनडीटी विद्यापीठातच उपलब्ध होतील, अशी माहिती कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी दिली.