मुंबई :
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्र चेतना आणि आरोग्याबाबत जनजागृती करणार्या या ऐतिहासिक उपक्रमात देशातील ३० राज्यातील ३० हजार शाळांमधील ३ लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभागी होऊन सूर्यनमस्कार घालावेत असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय योगासन क्रीडा महासंघाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सूर्यनमस्कार प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी दररोज १३ सूर्यनमस्कार घालायचे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी राज्य शैक्षक्षिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून राज्यातील शाळांना आवाहन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांनी घरातच राहून या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. घरातून सूर्यनमस्कार घालता यावे यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करायचे आहे. तसेच पालकांच्या सहकार्यांनीच विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालायचे असल्याच्या सूचनाही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.डी. सिंह यांनी केल्या आहेत.