मुंबई
दर वर्षी आपल्या उंच आणि विविध प्रकारच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील स्टुडिओ विजय आर खातू या नावाने प्रसिद्ध असलेला मूर्तिकार विजय खातू यांचा कारखाना आता येणाऱ्या वर्षी हैद्राबादला असणार असल्याचा खळबळजनक दावा विजय खातू यांच्या कन्या रेश्मा खातू यांनी केला आहे. काही तांत्रिक गोष्टींबाबत चर्चा सुरू आहे मात्र येणाऱ्या वर्षी नक्कीच हैदराबादला देखील जाणार असल्याचे मत रेश्मा खातू यांनी व्यक्त केले.
वडिलांचा वारसा पुढे चालवला
गेले अनेक वर्ष आपल्या कलेतून मुंबईतील विविध मंडळांच्या मूर्ती मूर्तिकार विजय खातू घडवत होते. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी रेश्मा खातूने वडिलांचा वारसा पुढे चालविण्यासठी संपूर्ण कामाची लगबग आपल्या हाती घेतली. तिच्या या धाडसी निर्णयासाठी सर्वच लोकांकडून कौतुक झाले. चिंचपोकळीचा चिंतामणी, चंदनावाडीचा गोड गणपती, प्रगती सेवा मंडळ या सारख्या अनेक मंडळांची मूर्ती यांच्या कारखान्यात साकार करण्यात आल्या. गणपती सोबतच देवीच्या मूर्ती देखील या कारखान्यात साकार करण्यात आल्या.
मुंबईतील मंडळांना काळजीचे करण नाही
दर वर्षी मुंबईतून देशासह जगातल्या विविध भागात मूर्ती पाठवल्या जातात. येणाऱ्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये मूर्तिकार रेश्मा खातू यांची कला आता हैद्राबादला सुद्धा पाहायला मिळणार आहे. पण मुंबईतील कारखाना सुद्धा बंद होणार नाही. यासाठी मुंबईतील मंडळांनी काळजी करायची नाही. मुंबई पासून सुरू झालेला हा प्रवास असाच चालत राहील असे देखील रेश्मा खातू यांनी सांगितले.