मुंबई :
मुंबई विद्यापीठात भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने ‘सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक’ या प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर विद्यापीठातील संगीत विभागात भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावे चेअरची स्थापन करून त्यांच्या नावे विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक बहाल करण्याचा महत्वपूर्ण ठराव बैठकीत झाला.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वरांनी अनेक गाणी अजरामर झाली आहेत. लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी आणि त्यांनी दिलेले संगीत दिलेल्या गाण्यांवर अभ्यास व संशोधन व्हावे यासाठी ‘सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक’ या स्वयंअर्थसहाय्यित केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रांच्या माध्यमातून पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पीएचडीसाठी संशोधन केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात स्थापन होणार्या एक्सलेंस सेंटरमध्ये अद्ययावत स्डुडिओ, सांगितीक उपकरणे, तांत्रिक सोयी सुविधांनी युक्त असे हे केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. संगीत क्षेत्रात अद्ययावत संशोधनाबरोबरच परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय सुगम संगीत क्षेत्रातील संशोधनाची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे लता मंगेशकर यांच्या कामगिरीवर शास्त्रोक्त अध्ययन करण्यासाठी संगीत विभागात भारतरत्न लता मंगेशकर चेअरची स्थापना केली जाणार आहे. त्याचबरोबर संगीत विभागात पदव्यूत्तर परीक्षेत प्राविण्य संपादन करणार्या विद्यार्थ्यांस भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावे सुवर्ण पदक बहाल करून गौरविण्यात येणार आहे.
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अजरामर स्वरांमुळे संगीत विश्वाला अमूल्य आणि ऐतिहासिक देणगी लाभली आहे. त्यांच्या सांगितीक कार्यकर्तृत्वांचा अजरामर ठेवा पुढील पिढीस प्रेरणा देणारा आहे. त्यांनी गायलेल्या गाण्यावर प्रगत अभ्यास आणि संशोधन व्हावे यासाठी विद्यापीठात लता मंगेशकर सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक सेंटर, त्यांच्या नावे चेअरची स्थापना आणि सुवर्ण पदक बहाल केले जाणार आहे. लता मंगेशकर यांना विद्यापीठाकडून ही शैक्षणिक आदरांजली आहे.
– प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ