Voice of Eastern

मुंबई : 

गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसरातील गंगोत्री १ या अत्यंत कठीण शिखरावर २९ सप्टेंबर रोजी गिरिप्रेमीच्या पूर्वा शिंदे (सिंह )आणि स्नेहा तळवटकर या दोघींनी यशस्वी चढाई करून भारताचा तिरंगा फडकवला.

गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसरात गंगोत्री शिखर समूह आहे. या समूहात गंगोत्री १, गंगोत्री २ आणि गंगोत्री ३ या शिखरांचा समावेश होतो. त्यापैकी गंगोत्री १ हे सर्वात ऊंच असून, चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीमधे गणले जाते. या शिखरावर गिरिप्रेमीचा संघ चार सप्टेंबर रोजी मोहिमेसाठी रवाना झाला होता. सलग २५ दिवस चाललेल्या या मोहिमेत अतिशय खडतर आव्हाने संघाने पार केली. या मोहिमेमध्ये पूर्वा शिंदे (सिंह) हिच्या नेतृत्वाखाली स्नेहा तळवटकर, रितू चावला, डॉ. सुनिता कोळके, हेमांग तन्ना यांनी सहभाग घेतला होता. गंगोत्री मोहिमेमध्ये संघाला बेसकॅम्पपासून शिखर माथ्यापर्यंत ३ कॅम्प लावावे लागले. यामध्ये कॅम्प १ नंतर पुढची चढाई पूर्णपणे उभ्या चढाची आणि तांत्रिक दृष्ट्या अतिशय अवघड होती. या अशा अत्यंत अवघड चढाईत हवामानही खुप प्रतिकूल झाले होते. सततची बर्फवृष्टी, वेगवान वारे यामुळे संघाचा वेग कमी कमी होत होता आणि दुप्पट ताकदीने पुन्हा सुरूवात करावी लागत होती. या परिस्थितीतही संघाने शेवटच्या समिट कॅम्पवरून ३ वेळा अंतिम शिखर चढाईसाठी प्रयत्न केले आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये खुप जिद्दीने या दोन महिला गिर्यारोहकांनी शिखर माथा गाठण्यात यश मिळवले.

हेही वाचा : माउंट मंदा शिखरावर उत्तर धारेने पहिली भारतीय मोहीम यशस्वी; भारतीय गिर्यारोहण इतिहासातील सुवर्णक्षण 

हवामान खराब असतानाही ६००० मी. वर संयमाने राहणे आणि आणखी वर जाणे कठीण असतानाही पुन्हा त्याच चिकाटीने प्रयत्न करणे यामागे गेल्या वर्षभरात झालेली शारीरिक आणि मानसिक तयारीच संघाला टिकवून ठेवते. या कामगिरीमुळे सर्वत्र या संघाचे कौतुक होत आहे. शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित गिरिप्रेमीचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे या संघाला मार्गदर्शन मिळाले.

हेही वाचा :माउंट मनास्लू या जगातील आठव्या उंच शिखरावर जितेंद्र गवारेची यशस्वी चढाई

महिला गिर्यारोहकांसाठी गुरुकुल संकल्पना

गिरिप्रेमीने दोन वर्षांपूर्वी महिला गिर्यारोहकांच्या संघाची उभारणी करण्याकरिता सुरू केलेल्या गुरुकुल या संकल्पनेतून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील १५ महिला सराव करत होत्या. त्यातून महिलांचे दोन संघ तयार झाले. त्यापैकी पहिल्या संघाच्या जुलै – ऑगस्ट मधील कांग्यत्से १ आणि २ या यशस्वी शिखर मोहिमेनंतर या दुसऱ्या महिला संघाने लगेचच तांत्रिक दृष्ट्या अत्यंत अवघड अशा शिखरावर मोहीम यशस्वी केली.

“भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गढवाल हिमालयातील “गंगोत्री” शिखरावर भारतीय तिरंगा फडकविण्याचे अभिमानास्पद कामगिरी महिला संघाने केली आहे.” गुरुकुलचा प्रशिक्षक समिरन कोल्हे यानेही संघाची खूप चांगली तयारी करून घेतली.
-उमेश झिरपे, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ गिर्यारोहक

Related posts

कुलगुरूंचा कोकणातील प्राचार्य, विद्यार्थ्यांशी संवाद

भविष्यातील धोके टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा सरकारने मोफत द्यावी – श्रीरंग बरगे

मुंबई विद्यापीठाच्या कारभारामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

Leave a Comment