मुंबई :
मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत, गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करून देखील प्रश्न सुटत नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक बंद केला. यामुळे मुंबई विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयाचे कामकाज ठप्प झाले.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या महासंघाच्या कृती समितीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून २२ नोव्हेंबर २०२१ रोजी एक दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक बंद करण्यात आला. यामध्ये राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांनी व वरीष्ठ महाविद्यालयानी सहभाग घेतला. जर शासनाने मागण्याची दखल घेतली नाही तर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची ५८ महिन्याची थकबाकी अदा करावी, पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करण्यात यावा, ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार १०,२० व ३० वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित योजना लागू करावी, अकृषी विद्यापीठातील ७९६ पदांना ७ वा वेतन आयोग त्वरित लागू करावा, विद्यापीठातील उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव व समकक्ष पदांना युजीसीच्या
शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात यावी आदी विविध प्रलंबित मागण्यासाठी हा लाक्षणिक बंद करण्यात आला आहे. या प्रलंबित मागण्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय व उच्चशिक्षण संचालनाल्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता.
मुंबई विद्यापीठातील मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघ, मुंबई विद्यापीठ मागासवर्गीय संघटना व मुंबई विद्यापीठ अधिकारी असोसिएशन या तिन्ही संघटना व एसएनडीटी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी या एक दिवसीय बंदमध्ये सहभागी घेतला. याप्रसंगी मुंबई विद्यापीठातील कर्मचारी संघ, मागासवर्गीय कर्मचारी संघटना व अधिकारी असोसिएशन यांनी संयुक्तरीत्या मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.सुधीर पुराणिक यांना मागण्याचे निवेदन दिले. मुंबई विद्यापीठातील फोर्ट व विद्यानगरी परिसरात यावेळी निदर्शने करण्यात आली. यामुळे मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व राज्यातील सर्व विद्यापीठाचे आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे कामकाज विस्कळीत झाले.