कल्याण :
काही लोकांना कल्याण लोकसभेची काळजी वाटते, मात्र त्यांनी काळजी करू नये. या मतदार संघातून मीच निवडणूक लढवणार व गेल्यावेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येणार आहे. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठीक आहे. पण त्या नादात आजीच्या पुढे माजी लागणार नाही, याची काळजी घ्या, अशा शब्दात कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील पाटीदार भवन येथे खोणी आणि शिरडोण म्हाडा रहिवासी महासंघतर्फे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या भागात नागरी सोयीसुविधा निर्माण करून दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की ,वायफळ बडबड करण्यात मला स्वारस्य नाही, त्यामुळे मी कधी कोणावर टीका करीत नाही. मला लोकांची कामे करायला आवडतात, माझे काम बोलत असते. मात्र काही लोकांना रोज टिकाटिपणी आणि खालच्या स्तरावर जाऊन भाष्य करायची सवय आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण लोकसभेच्या जागेवरून वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क सुरू आहेत. स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटामध्येही वाद सुरू आहे. या सर्व विरोधकांचा खासदार शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला. डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेमधूनच लढणार आहे. पहिल्यावेळी अडीच लाखाच्या मतांनी जिंकून आलो होतो, नंतर साडेतीन लाखाच्या मतांनी निवडून आलो, आता तुमची भर अजून पडलेली आहे तुम्ही मतदार झालेले आहेत. यावेळी मागचा रेकॉर्ड तोडण्यासाठी आपण मला मदत करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.