Voice of Eastern

मुंबई : 

काही कलाकार फार कमी चित्रपटांमध्ये झळकतात, पण अनोख्या अभिनयशैलीमुळं प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. त्यामुळंच असे कलाकार जेव्हा एखादा चित्रपट साईन करतात, तेव्हा त्याबद्दल आपोआपच उत्सुकता वाढते. अशा कलाकारांपैकीच एक आहे तन्वी हेगडे. आजवरच्या कारकिर्दीत तन्वीनं फार चित्रपट केले नाहीत. मोजक्या मालिका आणि चित्रपटांमध्ये तन्वीनं साकारलेल्या व्यक्तिरेखा रसिकांच्या हृदयात घर करणाऱ्या ठरल्या आहेत. ‘अलिप्त’ या आगामी मराठी चित्रपटाद्वारे तन्वी पुन्हा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे.

‘जान की कसम’ आणि ‘गज गामिनी’ या चित्रपटांमध्ये तन्वी बालकलाकाराच्या रूपात झळकली. त्यानंतर ‘राहुल’, ‘पिता’, ‘विरुद्ध’, ‘वाह! लाईफ हो तो ऐसी’, ‘चल चले’, ‘धुरंधर भाटवडेकर’, ‘अथांग’, ‘शिवा’ या चित्रपटांसोबतच ‘शाका लाका बूम बूम’ आणि ‘सोन परी’ या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. ‘अलिप्त बाबत तन्वी म्हणाली की, ज्या चित्रपटांमधील कॅरेक्टर्स माझ्या मनाला भिडतात तेच मी स्वीकारते. दिग्दर्शक मनोज येरुणकर यांनी जेव्हा ‘अलिप्त’चं कथानक ऐकवलं, तेव्हा त्यात नावीन्याच्या विविध छटा जाणवल्या. माझ्या व्यक्तिरेखेतील नाना पैलूंची जाणीव झाली. त्यामुळं ‘अलिप्त’ला नकार देण्याचं कारणच नव्हतं. कॅरेक्टर आणि कथानकाबाबत जास्त काही रिव्हील करता येणार नाही. या चित्रपटात काम करताना एका प्रोफेशनल युनिटसोबत मनासारखं काम करायला मिळाल्याचं समाधान लाभलं. या चित्रपटाच्या शीर्षकासोबत देण्यात आलेली ‘भूतकाळातील खुणा वर्तमानात अलिप्त होत नाहीत, तर त्या पुन्हा जन्म घेतात…’ ही टॅगलाईन खूप महत्त्वाची असून, कथानकाचा गाभा सांगणारी आहे. स्वप्नीलसह इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही आनंददायी होता असं तन्वी म्हणाली.

हे पण वाचा : रहस्यमय ‘अलिप्त’ लवकरच प्रदर्शित होणार

स्वप्नील आणि तन्वीसोबत या चित्रपटात शरयू सोनावणे, भूषण घाडी, सुनील देव, सुशांत शेलार आदी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. निर्माते अनिकेत विनायक कारंजकर यांनी ‘कटिंग चाय प्रॉडक्शन’ या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘अलिप्त’ या चित्रपटाची निर्मिती केली असून ‘संजू एंटरटेनमेंट’चे संजय लक्ष्मणराव यादव हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शक मनोज सुधाकर येरुणकर आहेत. स्वप्नील जाधव यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखन केलं असून, तन्वीसोबत मुख्य भूमिकाही साकारली आहे.

Related posts

मुंबईत नवजात बाळावर यशस्वी शस्त्रकिया करून जन्मजात व्यंगापासून केली सुटका

पीओपी गणेशमूर्तींना बंदीला विरोध; अन्यथा पर्याय द्या

कुर्ल्यातील काजूपाडा येथे घरावर दरड कोसळली

Leave a Comment