मुंबई :
देशातील प्रत्येक घराला २०२४ पर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी उपलब्ध करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चय केला आहे. त्यानुसार कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनचा व्यत्यय असतानाही अडीच वर्षांत जल जीवन अभियानाच्या माध्यमातून ५.७९ कोटींहून अधिक ग्रामीण घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला देशातील ९ कोटी ग्रामीण घरांमध्ये नळाद्वारे पुरवठा होत आहे.
जल जीवन अभियानची घोषणा १५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यावेळी देशातील १९.२७ कोटी घरांपैकी केवळ ३.२३ कोटी (१७%) घरांमध्ये नळजोडणी होती. मात्र अल्पावधीत ९८ जिल्हे, १,१२९ तालुके, ६६,०६७ ग्रामपंचायती आणि १,३६,१३५ गावांना ‘हर घर जल’ मोहिमेच्या माध्यमातून नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध केला. गोवा, तेलंगणा, हरयाणा, अंदमान आणि निकोबार बेटे, दादर आणि नगर हवेली, पुदुच्चेरी आणि दीव व दमणमध्ये ग्रामीण भागातील घराला नळाने पाणीपुरवठा होत आहे. गेल्या २४ महिन्यांत ११७ आकांक्षी जिल्ह्यांमधील घरांना नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा २४ लाख (९.३%) घरांवरून १.३६ कोटी (४०%) घरांपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे जपानी एन्सेफलायटीस-अॅक्युट एन्सेफलायटीस सिंड्रोम (जेई -आयईएस ) आजाराने बाधीत ६१ जिल्ह्यांमध्ये १.१५ कोटींहून अधिक घरांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
१७ लाख शाळा, अंगणवाड्यांना पाणीपुरवठा
देशातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाद्वारे स्वछ पाण्याचा पुरवठा करून मुलांचे आरोग्य आणि निरामयता सुनिश्चित करण्यासाठी ८.४६ लाख शाळा (८२%) आणि ८.६७ लाख (७८%) अंगणवाडी केंद्रांना पिण्यासाठी आणि माध्यान्ह भोजनाच्या स्वयंपाकासाठी, हात धुणे, शौचालयात वापरण्यासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. देशातील शाळांमध्ये ९३ हजार पर्जन्य जलसंचय (रेनवॉटर हार्वेस्टिंग) सुविधा आणि १.०८ लाख सांडपाणी पुनर्वापर संरचना विकसित केल्या आहेत.
गुणवत्ता तपासणीसाठी महिलांना प्रशिक्षण
क्षेत्रीय चाचणी संच (एफटीके) वापरून दूषित पाण्याचे नमुने तपासण्याचे प्रशिक्षण प्रत्येक गावातील पाच महिलांना देण्यात येत आहे. क्षेत्रीय चाचणी संचाद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आतापर्यंत ९.१३ लाखांहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.