मुंबई :
क्षयरोगाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्यातरी मुंबईतील शिवाजी नगर-मानखुर्द परिसरातमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक क्षयरोगाचे रुग्ण असल्याचे उघडकीस आले आहे. प्रत्यक्षात ही संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘टी.बी. हरेगा, शिवाजी नगर जितेगा’ या अभियानांतर्गत युवासेनेने शिवाजी नगर आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या परिसरातील क्षयरोग रुग्णांसाठी विशेष उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये शिवाजी नगर-मानखुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात क्षयरोग रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार या भागामध्ये दोन हजारांपेक्षा अधिक क्षयरोग रुग्ण आहेत. यामध्ये औषध संवेदनशील रुग्णांची संख्या ही ६०० ते ७०० इतकी आहे तर औषध प्रतिरोधी रुग्णांची संख्याही १५०० पेक्षा अधिक आहे. क्षयरोग रुग्णांना येणार्या समस्या आणि त्यांच्या आहाराच्या समस्या लक्षात घेता मानखुर्द-शिवाजी नगरमधील नागरिकांना उत्तमोत्तम सुविधा मिळावी यासाठी ‘टी.बी. हरेगा, शिवाजी नगर जितेगा’ या अभियानांतर्गत युवासेना विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभेचे युवासेनेचे विभाग अधिकारी गणेश वाव्हळ यांच्या पुढाकाराने आणि शिवाजी नगर आरोग्य केंद्राने संयुक्तरित्या परिसरातील नागरिकांना जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सकस आहाराचे वाटप केले. युवासेना मुंबई सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांच्या हस्ते क्षयरोग बाधित रुग्णांना प्रोटीन पावडर आणि एक लिटर दूधाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवाजी नगर आरोग्यकेंद्राचे डॉ. रमेश गाढवे, युवासेना युवती विभाग अधिकारी काजल खानोलकर, उपविभाग अधिकारी इरफान खान, प्रभारी शाखा अधिकारी कुशल रावल आणि प्रभारी शाखा अधिकारी साजिद मंसुरी आणि आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.