मुंबई :
विद्यार्थ्यांमधील कलेला वाव देणार्या रेखाकला परीक्षेतील इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २२ व २३ फेब्रुवारीला ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय कला संचालनालयाकडून घेण्यात आला आहे. मात्र ही परीक्षा ऑनलाईनऐवजी ऑफलाईनच घेण्यात यावी, अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाकडून कला संचालनालयाच्या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होत असताना इंटरमिजिएट परीक्षा ऑनलाईन घेण्याचा संचालनालयाचा अट्टाहास का असा प्रश्न महामंडळाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्षे २०२१-२२ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची फक्त इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २२ व २३ फेब्रुवारीला ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी १२ ते २० फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना ड्रॉईंग पेपर, रंग साहित्य, मोबाईल नेट पॅकसाठी स्वत: खर्च करावे लागणार आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असतानाही कला संचालनालयाकडून यंदा परीक्षा शुल्कात दुपटीने वाढ केली आहे. परीक्षा शुल्क १०० रुपयांवरून २०० रुपये इतके करण्यात आले आहे. परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थीही सहभागी होतात. ऐन परीक्षेदरम्यान वीज गेली किंवा नेटवर्क समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन घेतल्यास विद्यार्थी मानसिक ताणासह नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार असल्याने पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रेखाकला परीक्षेत दोन दिवसांत चार पेपर असतात. प्रत्येक दिवशी सलग सहा तास मोबाईल सुरू ठेवावा लागणार आहे. ऐन परीक्षेदरम्यान मोबाईलची बॅटरी संपण्याची शक्यता आहे. परिणामी परीक्षा द्यायची की मोबाईलची चार्जिंगकडे लक्ष द्यायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होऊ शकते. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांसमोर असलेली विविध संकटे पाहता ही परीक्षा ऑनलाईनऐवजी ऑफलाईनच घेण्यात यावी अशी भूमिका महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा यांनी मांडली आहे.
२०१९ च्या ऑनलाईन परीक्षेत बट्ट्याबोळ
कला संचालनालयाकडून नोव्हेंबर २०१९ मध्ये शासकीय रेखा कला परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका ऑनलाईन वितरित करण्यामध्ये प्रचंड गोधळ झाला होता. प्रश्नपत्रिका वेळेवर केंद्रांवर पोहोचल्या नव्हत्या. तसेच त्याची गोपनीयताही राखणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे यावेळी परीक्षा व्यवस्थित पार पडेल का याबाबत महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे.
परीक्षा ऑफलाईन घेणे शक्य
रेखाकला परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी राज्य सरकारकडून मे.एस.एम.बी सिस्टिम प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती केली आहे. इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला राज्यातून साधारणपणे ७० हजार विद्यार्थी नोंदणी करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होऊ शकतात. तर ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन का होऊ शकत नाही, असा प्रश्नही प्रकाशचंद्र मिश्रा यांनी उपस्थित केला आहे.