मुंबई :
सिंगापूरमध्ये १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या ‘सिंगापूर एअर शो-२०२२’ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दल शनिवारी सिंगापूरमधील चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. भारतीय हवाई दलाची ४४ सदस्यांची तुकडी आहे.
जागतिक स्तरावरच्या विमान वाहतूक उद्योगाला त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी सिंगापूर एअर शो हक्काचे व्यासपीठ समजला जातो. सिंगापूर एअर शो हा एक द्विवार्षिक कार्यक्रम आहे. स्वदेशी बनावटीचे तेजस एमके-I लढाऊ विमान यावेळी भारतीय हवाई दल जगभरातील सहभागी देशांपुढे सादर करणार आहे. तेजस विमान आपल्या एरोबॅटिक्सच्या प्रदर्शनासह त्याच्या उत्कृष्ट हाताळणीची वैशिष्ट्ये आणि कुशलता दाखवून प्रेक्षकांना भुरळ घालेल. हवाई कसरतींमध्ये भारतीय दलाचा सहभागामुळे भारताला तेजस विमानाचे प्रदर्शन करण्याबरोबरच रॉयल सिंगापूर एअर फोर्स आणि अन्य सहभागी देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
भारतीय हवाई दलाने स्वदेशी विमाने आणि एरोबॅटिक संघ तयार करण्यासाठी यापूर्वी मलेशियामध्ये एलआयएमए २०१९ आणि दुबई एअर शो २०२१ सारख्या एअर शोमध्ये भाग घेतला होता.