Voice of Eastern

मुंबई :

बारावीच्या परीक्षेत पेपरफुटीची प्रकरणे उघडकीस येत असताना आजपासून राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. राज्य मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या परीक्षेला राज्यातून राज्यातून १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४७८ विद्यार्थींनीचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा तणावमुक्त व भीतीमुक्त वातावरणात करण्यासाठी राज्य मंडळाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त होऊन परीक्षा द्यावी, असे आवाहनही राज्य मंडळाने केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ ची दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान होत आहे. या परीक्षेसाठी २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी परीक्षा सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्राची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५ हजार ५० मुख्य केंद्र व १६ हजार ३३४ उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिद्ध व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरण्यात यावे असे मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता व गैरमार्गाचा वापर न करता परीक्षा द्यावी. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रसंचालक, उपकेंद्र संचालक, शिपाईपासून सर्व कर्मचारी, कस्टोडियन, सहाय्यक परिरक्षक यांच्यासोबत तीन बैठका घेऊन त्यांना सविस्तर प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पार पडेल, असे राज्य मंडळाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांनी सांगितले.

Related posts

‘श्याम’च्या भूमिकेत शर्व गाडगीळ, तर आईच्या रूपात गौरी देशपांडे

मुंबई महापालिकेची ‘उद्यान एक्स्प्रेस’ ठरतेय आकर्षणाचा केंद्र

सांगलीचा सूरज लांडे पुरुषांच्या तर ठाण्याची रेश्मा राठोड महिलांच्या कर्णधार पदी

Leave a Comment