Voice of Eastern

मुंबई : 

शालेय शिक्षण विभागाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकात कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव नसल्याचे लक्षात घेऊन त्यांना परीक्षेच्या वेळेत सवलत देण्यात आली आहे. ८० गुणांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना ३० मिनिटे तर ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यास मदत होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ग्रामीण भाग वगळता शहरी भागातील दहावी, बारावीचे वर्ग दिवाळीपर्यंत ऑनलाईनच सुरू होते. त्यामुळे यावर्षीही गतवर्षीप्रमाणे मुल्यांकन पद्धतीने निकाल लावण्याची मागणी पालकांकडून होत होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्या असल्याने राज्य मंडळाने दहावी, बारावीची परीक्षा प्रत्यक्ष घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार १२वीची परीक्षा ४ मार्च तर दहावीची परीक्षा १५ मार्चपासून घेण्याचे जाहीर केले. तसेच परीक्षेचे वेळापत्रकही मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. लिखाणाचा सराव नसल्याने विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना हात दुखणे, अवघडणे, बोटे दुखणे अशा समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दहावी व बारावीच्या पेपरवेळी विद्यार्थ्यांना वेळेत सवलत देण्यात आली आहे. दहावीच्या ८० गुणांचा पेपर असलेल्या विषयांसाठी साडेतीन तास तर गणित, विज्ञान,समाजशास्त्र यासारख्या विषयांसाठी सव्वादोन तास देण्यात आले आहेत. म्हणजेच प्रथम, द्वितीय व तृतीय भाषेसाठी ३० मिनिटे तर गणित, विज्ञान, समाजिक शास्त्रे या विषयांसाठी १५ मिनिटे अतिरिक्त देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांनाही भाषेसाठी ३० मिनिटांची तसेच व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रमांचे विषय आणि अन्य विषयांसाठी १५ मिनिटे अतिरिक्त देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा लिहिताना हात दुखणे, अवघडणे अशा समस्या निर्माण झाल्यास त्यांना या अतिरिक्त वेळेचा उपयोग होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग २० महिने शाळा बंद असल्याने मुलांचा लिहिण्याचा सराव बंद झाला आहे. त्यामुळे परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना पेपरनिहाय अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गतवर्षीही असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गतवर्षी परीक्षाच झाल्या नसल्याने त्याची अंमलबजावणी झाली नाही. मात्र यावेळीही तशीच परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांना वेळेच्या सवलतीचा फायदा देण्यात आल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

Related posts

सीईटी सेलच्या सुसंवाद मेळाव्याला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Voice of Eastern

विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करा – चंद्रकांत पाटील

राजभवन भेट १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु

Voice of Eastern

Leave a Comment