मुंबई :
मुंबईसह राज्यातील २५ हजार विनाअनुदानित शिक्षकांनी कोणत्याही उत्तरपत्रिका नाकारल्या नसून त्या मंडळाकडे परत आल्या नाहीत. तसेच दहावी, बारावीचा निकाल वेळेवर जाहीर करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती मुंबई विभागीय सचिव डॉ सुभाष बोरसे यांनी दिली. तर विनाअनुदानित शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडे पाठवलेले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे आता शिक्षक स्वत: विभागीय मंडळात जमा करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मुंबई अध्यक्ष संजय डावरे यांनी दिला.
आपल्या मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांमधील २५ हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठवले असल्याची माहिती डावरे यांनी दिली. मात्र विभागीय मंडळाला अशा कोणत्याही उत्तरपत्रिका प्राप्त झाल्या नाहीत. टपाल कार्यालयाचा दोन दिवसाचा संप असल्याने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे वितरीत करण्यास विलंब झाला होता. त्यानंतर टपाल कार्यालय नियमित सुरू असून उत्तरपत्रिका वितरणाचे काम सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे दहावी आणि बाावीच्या परीक्षांचे निकाल नियोजित वेळापत्रकानुसार जाहीर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सुभाष बोरसे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. राज्य मंडळाच्या या निवेदनाचा विरोध करत आम्ही उत्तरपत्रिका मुख्याध्यापकांकडे सोपवल्या होत्या. मात्र आता मागण्या पूर्ण करण्यास विलंब होणार असेल तर थेट विभागीय मंडळातच जमा करू असा इशारा कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मुंबई अध्यक्ष संजय डावरे यांनी दिली.