ठाणे :
लार्सन टूर्बो संघाने बीएमसी सिक्युरिटीज संघाचा ४० धावांनी पराभव करत ४६ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन टी -२० क्रिकेट स्पर्धेतील आगेकूच कायम राखली.
सेन्ट्रल मैदानावर झालेल्या सामन्यात लार्सन टूर्बो संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद १९९ धावा केल्या. संघासाठी आव्हानात्मक धावसंख्या उभारताना जतिन राठीने नाबाद ३०, सागर कांबळेने नाबाद २५ आणि शिवा यादवने ३६ धावांचे योगदान दिले. हेमंत बुरडे, सुयोग गायकवाड, कृष्णप्रसाद अंबुरे आणि महादेव झोलंबेकरने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बीएमसी सिक्युरिटीज संघाला २० षटकात ९ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारता आली. हेमंत हरडने ४७ आणि विनायक कोकणेने २८ धावा केल्या. सिद्धेश चव्हाणने प्रतिस्पर्धी संघाला रोखताना १८ धावांत ३ विकेट्स मिळवल्या. जगदीश सोरखड, मुकेश पाटीलने प्रत्येकी दोन, तर सचिन आहुजा आणि जतिन सेठीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.