ठाणे :
आमदार अपात्रता ही कायदेशीर प्रक्रिया आहे. याविरोधात विरोधकांनी काहीही टीका केली तरी त्याला कोणातच अर्थ नाही. लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असते आणि बहुमत आमच्या बाजूने आहे. तसेच निवडणूक आयोगानेच पक्ष आणि चिन्हासंदर्भातील निर्णय आमच्या बाजूने दिला असल्याने पक्ष आणि चिन्ह आमचेच आहे. मात्र खासदार संजय राऊत आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामुळेच शरद पवारांना सोडून गेल्याचा आरोप त्यांनी ठाण्यात सोमवारी एका पत्रकार परिषदेत केला. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर ही टीका केली.
नुकताच नागपूरला झालेल्या मोठा पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी कुठे गेले नागपूरचे सुपुत्र अशी जळजळीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. त्याचा देखील म्हस्के यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घातल्याने यावर्षी मुंबईत पाणी तुंबले नाही. मात्र मुंबईत यापूर्वी १ तास पाऊस पडला तरी मुंबई तुंबत होती. गेली २५ वर्ष तुमची सत्ता होती, मग उद्धव ठाकरे यांच्यावर टीका का नाही केली असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला. तसेच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात आमदारकी सोडा केवळ नगरसेवक पदाची निवडणूक जिंकून दाखवावी असे खुले आव्हान म्हस्के यांनी देत, पुनरुच्चार केला. याशिवाय मुस्लिम आरक्षणसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. आमचे नेते जे भूमिका मांडतील ती आमची भूमिका असेल असेही म्हस्के यांनी त्यावेळी स्पष्ट केले.