मुंबई :
दिवाळीमध्ये नागरिकांचा मिठाई, दुग्धजन्य पदार्थ विकत घेण्याकडे अधिक कल असतो. या कालावधीत नागरिकांनी सकस, भेसळमुक्त आणि निर्भेळ मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.
जिल्हा स्तरावरील अधिकार्यांनी मिठाई व इतर खाद्य पदार्थांच्या उत्पादकांसोबत बैठक घेऊन त्यांना योग्य निर्देश द्यावेत. मिठाई व इतर पदार्थांवर तयार करण्याची आणि संपण्याची दिनांक टाकणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती करावी. त्याचबरोबर दुध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तपासणी वाढवावी आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना त्यांनी दिले. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकतेच वांद्रे येथील कार्यालयात विभागाच्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, सर्व सह आयुक्त प्रत्यक्ष व इतर जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
हे पण वाचा : दिवाळीच्या तोंडावर ३१ लाखांचा भेसळयुक्त अन्नपदार्थाचा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची राज्यभरात धाडसत्र
औषध प्रशासनातर्फे तपासणीत ज्या औषध विक्री दुकानात फार्मसिस्ट नाहीत असे आढळलेल्या दुकानांचे परवाने रद्द करणे, आयुर्वेद, अॅलोपॅथी व इतर औषध निर्मितींचा दर्जा सातत्याने तपासला जाणे आणि विभागातील पदभरती इत्यादी विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला.