मुंबई :
राज्यातील विविध सरकारी रुग्णालयामध्ये औषध निर्माता ‘गट क’मध्ये कार्यरत असलेल्या ‘गट ब’मध्ये पदोन्नती न देता एमपीएससीच्या माध्यमातून १२ पदे भरण्यात येत आहेत. या पदभरतीमुळे ‘गट क’मधील औषध निर्मात्यांवर (फार्मासिस्ट) अन्याय करण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे ६ जानेवारीपासून राज्यातील सरकारी रुग्णालयातील फार्मासिस्टने आंदोलन पुकारले आहे. सर्व फार्मासिस्ट हाताला काळी रिबिन आणि तोंडाला काळे मास्क लावून काम करणार आहेत.
सध्या प्रकाशित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रकाशित केलेल्या जाहिराती रद्द करण्यास नकार दिल्याने आमच्यावर आतापर्यंत झालेला अन्याय दूर झालेला नाही. औषधनिर्माता गट क जवळजवळ २००६ पासून संचालनालय व शासनाच्या वेळोवेळी आमच्यावर होणार अन्याय निदर्शनास आणून देत होतो. संचालनालयाने वेळोवेळी काही उच्चस्तरीयसमित्या व पत्रव्यवहार करून याबाबत अपेक्षित बदल मान्यही केलेले आहे. परंतु वेळेत नविन नियुक्ती नियम न बनवल्यामुळे संचालनालयाने त्याकडे दुर्लक्ष करून आमच्यावर होत असलेला अन्याय चालुच ठेवला आहे. हा अन्याय संचालनालयाच्या ढिसाळ कारभारामुळे असून, त्यात आम्हा औषधनिर्मांतांच्या कोणताही दोष अथवा चूक अथवा कार्यढिसाळपणा नाही.
औषध निर्माता गट ब पदाच्या १२ पदांसाठी आवेदन पत्र मागविण्यात आलेले आहेत. ही आवेदने पाठवण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२२ आहे. संदर्भ क्रमांक २ नुसार जाहिराती रद्द करणे, नियुक्ती नियमांमध्ये सुधारणा करणे व १२ पदे विभागातील औषधनिर्माण वर्ग ३ मधील पात्र उमेदवारांमधून पदोन्नतीने भरणेबाबत विनंती करूनही मागण्या मान्य न झाल्यास नाइलाजास्तव आम्हाला आंदोलन पुकारावे लागत आहे. आम्ही पुढील सात दिवस हाताला काळी रिबिन आणि तोंडाला काळे मास्क लावून काम करून आंदोलन करणार असल्याचे औषध निर्माता वर्ग ३ चे कर्मचारी यांनी सांगितले.