Voice of Eastern

मुंबई :

दादरमधील भवानी शंकर रोडवर एका ड्रेनेज चेंबरमध्ये अचानक पडलेल्या गाईच्या वासराची अग्निशमन दल, पालिका कर्मचारी, अधिकारी यांनी अथक प्रयत्न करून अखेर पाच तासांनी सुखरूप सुटका केली. वासराला सुखरूप बाहेर काढल्यानंतर गाईची मालकीण गंगूबाई शिंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

गाय पाळणाऱ्या व त्या गाईंना मंदिरासमोर बसवून चारा घालण्याचा व्यवसाय करणाऱ्या गंगुबाई शिंदे यांच्या गाईचे दीड ते दोन वर्षांचे एक वासरू सोमवारी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास दादर पश्चिमेकडील भवानी शंकर रोड येथील राम मंदिराजवळ एका ड्रेनेज चेंबरमध्ये अचानकपणे पडले. चेंबर फारच छोटे असल्याने ते अशा स्थितीत अडकून पडले की, वासराला जागचे हलताही येत नव्हते. त्यामुळे वासराच्या अंगाला काही ठिकाणी खरचटले होते. गंगुबाई व इतर काही नागरिकांनी त्या वासराला चेंबरमधून काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. या घटनेची माहिती जी/उत्तर विभागाचे कनिष्ठ अवेक्षक राणे यांना कंट्रोल रुमवरून मिळाल्यानंतर त्यांनी ही माहिती तात्काळ आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला कळवली. त्यानंतर जेसीबी, मनुष्यबळ आदी यंत्रणा घटनास्थळी मागविण्यात आली. सकाळी ७:१० वाजताच्या सुमारास अग्निशामक दल, ड्रेनेज, पर्जन्य जलवाहिनी विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले. तसेच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तर जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनीही सतत त्या घटनेकडे लक्ष देत वार्ड कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

असे काढले वासराला बाहेर

वारसाला बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न झाल्यानंतर जेसीबीद्वारे चेंबर तोडून बाजुला ५ ते ५.५ फूटाचा खड्डा खोदून त्या गाईच्या वासरूला कसेतरी उभे करून दोरीच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या बांधून सर्व कर्मचाऱ्यांनी चेंबरमधून सकाळी ११.३० वाजता बाहेर काढले. त्यानंतर जी / उत्तर विभागातील आरोग्य विभागातील वेद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विरेंद्र मोहिते व डॉ. संजय पाटील यांच्या माध्यमातून घटनास्थळी दाखल आरोग्य खात्याच्या पथकाने गाईच्या वासराला ज्या ठिकाणी खरचटले व जखम झाली होती, त्याठिकाणी तातडीने औषधोपचार केले. त्यानंतर गाईच्या वासराला गाय सांभाळणाऱ्या
गंगुबाई शिंदे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर ते वासरू घाबरलेल्या व जखमी अवस्थेत भरपूर पाणी प्यायले व त्याने मनसोक्त  हिरवा चारा खाल्ला.

Related posts

मुंबईत तीन वर्षात प्रसुतीदरम्यान ६४४ मातामृत्यू

मेट्रोच्या भिंती रंगवणार्‍या चार इटालियन नागरिकांना अहमदाबादमधून अटक

‘खेतवाडीचा राजा’चे आगमन

Voice of Eastern

Leave a Comment