महाड :
महाड तालुक्यातील पारवाडी या आदिवासी वाडीला अनेक वर्षांपासून भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या आजही कायम आहे. कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेल्या या वाडीतील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मे महिन्यात आटल्याने आदिवासींना नदीमध्ये डबकी खोदून त्यातील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

ऐन उन्हाळ्यामध्ये महाडमधील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागते. अनेक गावांना दूरहून पाणी आणावे लागत आहे. मांडले पारवाडी या आदीवासी वाडीमध्येही पुन्हा एका पाण्याच्या टंचाईने डोके वर काढले आहे. मांडले पारवाडी आदिवासीवाडी येथे तीन आदिवासी वाड्या आहेत. प्रत्येक आदिवासी वाडीवर किमान ६० घरे आहेत. पारवाडी आदिवासीवाडीला कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. यामुळे स्थानिकांना ओढा व विहीरीतील पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. ओढ्यावर बंधार्याचे काम केले आहे. मात्र पाण्याची साठवणुकीसाठी कोणतीही उपाययोजना नाही. एप्रिलपासूनच वाडीला पाणीटंचाई जाणवू लागते. नदी व ओढे कोरडे पडून त्यातील दगडगोटे दिसू लागतात. आणि विहीरीतील पाणीही तळ गाठते. अशावेळी आदिवासींची पायपीट सुरू होते. पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर अंतर कापावे लागते. अनेकदा हे आदिवासी नदीतील रेती व गोटे बाजूला करून त्यात छोटी छोटी डबकी तयार करतात. या डबक्यातून वाटी वाटीने पाणी भरून आपली गरज भागवतात. नदीमध्ये एक विहीर खोदावी अशी मागणी आदिवासींनी अनेक वर्ष पंचायत समितीकडे केली आहे. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
शासन दरबारी आदिवासी घटक आजही उपेक्षित असल्याने या वाड्यांवर पाणीपुरवठ्यासाठी फारसे नियोजन केले जात नाही. याचे उदाहरण म्हणजे पारवाडी आदिवासी वाडी आहे. भारत निर्माण अभियान, पथदर्शी योजना, राष्ट्रीय पेयजल योजना अशा योजनांतून पाण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च होत असतानाच पारवाडी आदिवासीवाड्यांवर मात्र तीव्र पाणीटंचाई सोसावी लागत आहे.