मुंबई :
विक्रोळीला पूर्व व पश्चिम जोडणारा उड्डाणपूल नसल्याने वाहनचालकांना इंधन भरण्यासाठी मोठा फेरा मारावा लागत होता. परिणामी वाहनात भरलेले बहुतांश इंधन हे पूर्वेकडून पश्चिमेला ये-जा करण्यासाठीच लागत असे. नागरिकांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडण्यासाठी उड्डाणपुलाचे काम हाती घेतले. मात्र त्यामुळे हा पूल पूर्ण होऊन वाहनचालकांना त्याचा वापर करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
विक्रोळी रेल्वे स्थानक येथे पूर्व व पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी अनेक राजकीय पक्ष, नागरी संघटना, सामाजिक संस्थांकडून पालिकेकडे करण्यात येत होती. याची दखल घेत २ मे २०१८ रोजी उड्डाणपुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. उड्डाणपुलाचे काम १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सल्लागाराने ऐनवेळी पुलाच्या कामात काही बदल सुचविल्याने कामाची व्याप्ती व खर्च वाढला. पुलाच्या खर्च तब्बल ५१ कोटीने वाढला. पुलामध्ये पीएससी गर्डर ऐवजी स्टील गर्डर वापरले जाणार आहेत. तसेच पुलाचे काम जलद करण्यासाठी बांधकामाच्या सुपरस्ट्रक्चरच्या डिझाईनमध्ये आमूलाग्र बदल करत ते सुधारित तांत्रिक कार्यपद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुलाच्या कंत्राट खर्चात व सल्लागाराच्या मानधनातही वाढ झाली आहे. पुलाचा कंत्राट खर्च ३७ कोटी वरून थेट ८८ कोटी इतका झाला आहे. आतापर्यंत या पुलाचे फक्त ४० टक्केच काम झाले आहे.