Voice of Eastern
ताज्या बातम्या मोठी बातमी शहर

माउंट मंदा शिखरावर उत्तर धारेने पहिली भारतीय मोहीम यशस्वी; भारतीय गिर्यारोहण इतिहासातील सुवर्णक्षण 

banner

मुंबई :

माउंट मंदा-१ या ६५१० मीटर उंच व चढाईसाठी तांत्रिकदृष्टया अतिशय आव्हानात्मक शिखरावर यशस्वी चढाई करत गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय रचला. धोकादायक अशा उत्तर धारेने चढाई करत डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे व पवन हडोळे यांनी शिखरमाथा गाठला. त्यांना मिन्ग्मा शेर्पा व निम दोर्जे शेर्पा यांनी साथ दिली. माउंट मंदा-१ शिखराच्या उत्तर धारेने यशस्वी झालेली ही पहिली भारतीय गिर्यारोहण मोहीम आहे. एव्हरेस्ट शिखरवीर आनंद माळी यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले तर जेष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे मोहिमेला मार्गदर्शन लाभले.

हिमालयातील केदारगंगा व्हॅलीत माउंट मंदा हा तीन शिखरांचा समूह आहे. यापैकी माउंट मंदा-१ या शिखराची उंची ६५१० मीटर असून चढाईसाठी हे शिखर अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. या शिखरावर आजपर्यंत बोटावर मोजण्याइतक्या मोहिमांचे आयोजन केले गेले असून या शिखराने बहुतांश वेळा गिर्यारोहकांना हुलकावणी दिली आहे. गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी १९८९ व १९९१ असे दोनवेळा माउंट मंदा-१ या शिखरावर मोहीम आयोजित केली होती, मात्र दोन्ही वेळा संघाला शिखर चढाई करण्यात अपयश आले होते. यावेळी मात्र, तब्बल ३२ वर्षांनी गिरिप्रेमीच्या नव्या दमाच्या गिर्यारोहकांनी गिर्यारोहणातील कौशल्ये पणाला लावून शिखर चढाई यशस्वी केली. सतत होणारे हिमप्रपात, सोबतीला असणारे रॉकफॉलच्या आव्हानांना तोंड देत हिमभेगांना चुकवत, कधी कठीण बर्फाळ मार्गावरून तर कधी भुसभुशीत हिमांतून वाट काढत ७० ते ८० अंश कोनांतील हिमभिंतीचे व अतिशय तीव्र धारेचे आव्हाने स्वीकारत १८ सप्टेंबरच्या सकाळी संघाने शिखरमाथा गाठण्यात यश मिळवले.

माउंट मंदा-१ शिखराची उत्तर धार ही अत्यंत धोकादायक व आव्हानात्मक आहे. निमुळत्या आकाराची, तीव्र उतार असलेल्या उत्तर धारेच्या मार्गाने याआधी एकही भारतीय गिर्यारोहण मोहीम यशस्वी झाली नव्हती. त्यामुळे गिर्यारोहकांसमोर मोठे आव्हान होते. समोर येणाऱ्या सर्व संकटांना सामोरे जात, आव्हानांना पेलत गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई करत भारतीय गिर्यारोहण इतिहासातील अतुल्य कामगिरी केली. विशेष बाब म्हणजे गिर्यारोहकांनी रूट ओपनिंग व रोप फिक्सिंग या कठीण श्रेणीत गणल्या जाणाऱ्या कामांमध्ये देखील शेर्पांसमवेत सहभाग नोंदविला.

Related posts

मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविकांचा सोमवारी ११ मागण्यांसाठी संप

नववर्षात महिला लोकल डब्यात लावणार सीसीटीव्ही कॅमेरे

Voice of Eastern

मोना डार्लिंगच्या प्रवासाला तांत्रिक बिघाडाचा फटका