मुंबई :
पाऊस, उन्ह या वातावरणामुळे थंडी कधीपासून सुरू होणार असा प्रश्न नागरिकांना पडला होता. मात्र नववर्षामध्ये थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहरासह उपनगरामध्ये किमान तापमान १३ ते १४ डिग्रीपर्यंत खाली घसरेल. तर कमाल तापमान २६ ते २७ डिग्रीपर्यंत घट होऊन चांगलीच थंडी जाणवू शकते. महाराष्ट्राशेजारील गुजरात, मध्य प्रदेश या राज्यात देखील आगामी आठवड्यात किमान तापमानात विशेष घट होऊन चांगलीच थंडी जाणवणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यात आता पाऊस, गारपीट होणार नसून थंडीसाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. संपूर्ण राज्यात फक्त थंडीच राहणार आहे. यामुळे थंडीचा रब्बी पिके तसेच लागवड केलेल्या कांद्याना फायदा होत आहे. सध्याचा उन्हाळ कांद्याच्या लागवडीला नजिकच्या काळात वातावरणाचा कोणताही अडथळा जाणवणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील आठवड्यात काश्मीर, लेह लडाखपासून राजस्थान, उत्तर मध्य प्रदेशसह उत्तर प्रदेशपर्यंत एका मागोमाग एक अशा पश्चिमी प्रकोपांच्या साखळीतून नेहमी प्रमाणे अक्षवृत्त समांतर पश्चिमेकडून पूर्वेकडे मार्गस्थच होणार आहे. परिणामी संपूर्ण उत्तर भारत पाऊस, बर्फवृष्टी तर काही ठिकाणी गारपीट व दाट धुके व त्यातून सकाळच्या वेळेत खालावलेली दृश्यमानता अशा वातावरणीय घडामोडीची उलथापालथ तेथे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वातावरणीय घडामोडीमुळे महाराष्ट्रात चांगली थंडी पडू शकते, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.