मुंबई :
ग्लोबल वार्मिंग, वाढते शहरीकरण आणि वाढती वाहनसंख्या, यामुळे प्रदूषणामध्ये भारत हा जगात तिसर्या क्रमांकावर आहे. डोंगर फोडून, जंगलं तोडून आणि चांगल्या रस्त्यांची बांधणी केली म्हणजे विकास होतो असे नसून विकासाच्या नावाखाली आज अनेक झाडांची कत्तल होत असून भविष्यात मोठी समस्या उद्भवणार आहे अशी खंत पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी व्यक्त केली. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने आयोजित केलेल्या ६४ व्या विवेकानंद व्याख्यानमालेत ते ‘प’ पर्यावरणाचा या विषयावर पाचव्या आणि अंतिम पुष्पात बोलत होते.
ऑलिम्पिकमधील खेळासाठी खेळाडूंना भारतात पूरक असे वातावरण जरी नसले तरी टोकियो ऑलिम्पिक मधील खेळाडूंची कामगिरी प्रशंसनीय अशी आहे असे क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांनी सांगितले. ‘खेलो इंडिया जितो इंडिया’ या विषयावर त्यांनी चौथे पुष्प गुंफले त्यावेळी ते बोलत होते. ‘डिजिटल भारत, एक अपरिहार्य बदल’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना लेखक आणि प्राध्यापक अतुल कहाते यांनी सांगितले की, डिजिटल तंत्रज्ञान हे समाजातील काही घटकांपुरतेच मर्यादित राहिले आहे पण ज्यावेळी समाजातील सर्व घटक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करतील तेव्हा आपण सर्वार्थाने डिजिटल युग आले असे म्हणू.
मुलांना लहानपणीच चांगल्या सवयी लावणे हे गरजेचे आहे. त्यामुळे पालक आपल्या पाल्याला आज कोणत्या सवयी लावत आहे. त्यावर आपल्या पाल्याचे भावविश्व अवलंबून आहे. तसेच आपल्या पाल्याला वेळ द्या आणि त्यांचे भावविश्व समजून घ्या असे स्पष्ट मत लोणावळा येथील मनशक्ती केंद्राचे वरिष्ठ प्रशिक्षक मयुरी चंदने यांनी व्यक्त केले. ‘मुलांचे बदलते भावविश्व’ या विषयावर दुसरे पुष्प त्यांनी गुंफले त्यावेळी ते बोलत होते. सध्याच्या स्पर्धात्मक युगात पालक हे आपल्या पाल्याला केवळ उपजीविकेचे शिक्षण देत असून जीवन विषयक शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. मुलांवर चांगले संस्कार करा पण संस्कार म्हणजे नेमके काय तर गुणांचा गुणाकार करा आणि दोषांचा भागाकार करा म्हणजे संस्कार अशी व्याख्या चंदने यांनी केली आहे.
‘भय इथले संपत नाही’ अशी अवस्था आज आपली आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील सर्वांनी कोव्हिड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर लहान मुलांना सुद्धा कोव्हिडचे लसीकरण लवकरच सुरू होईल असे संकेत महाराष्ट्र टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी दिले आहेत. कोरोना आणि आरोग्य साक्षरता या विषयावर पहिल्या पुष्पात पत्रकार संतोष आंधळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. लसीकरणा संदर्भात अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे. अनेक लोकांनी पहिला डोस सुद्धा घेतलेला नाही तर अशा लोकांनी लवकरात लवकर पहिला डोस घेऊन शासनास सहकार्य करावे. व्याख्यानमालेच्या पाचव्या आणि अंतिम पुष्पात व्याख्यानमाला प्रमुख सुशील पार्टी यांनी प्रास्तविक केले तर आभार मंडळ प्रमुख निलेश घोडेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मान्यवरांचा परिचय विवेकानंद स्मृती प्रमुख कमलेश जगदाळे यांनी केला.