Voice of Eastern

मुंबई :

कला संचालनालयाकडून २२ व २३ फेब्रुवारीला फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांची इंटरमिजिएट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे जाहीर केले होते. मात्र राज्यातील कला शिक्षक व विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन परीक्षेला विरोध झाल्याने अखेर बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे आदेश तंत्रशिक्षण विभागला दिले. तसेच परीक्षेची तारीख पुढे ढकलत आता ही परीक्षा दहावीची राज्य मंडळाची परीक्षा संपल्यानंतर एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाने १८ जानेवारी २०२२ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार इंटरमिजिएट परीक्षा १२ व १३ फेब्रुवारी रोजी घेण्याचे जाहीर केले होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे १० फेब्रुवारी रोजी नव्याने परिपत्रक काढून ही परीक्षा २२ व २३ फेब्रुवारीला ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे जाहीर केले. दरवर्षी या परीक्षेसाठी १०० रुपये शुल्क आकरले जाते. मात्र ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या या परीक्षेसाठी दुप्पट शुल्क आकरण्यात आले. त्यातही परीक्षेचे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना आणण्यास सांगण्यात आले होते. या सर्व प्रक्रियेला राज्यातील कला शिक्षक, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ व शिक्षक भारतीकडून विरोध करण्यात आला. इंटरमिजिएट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य नाही. ही परीक्षा ऑफलाईनच घेण्यात यावी, तसेच वाढीव शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली. इंटरमिजिएट परीक्षा ऑनलाईन झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी स्वतःचा मोबाइल, लॅपटॉप असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दिवसाला पाच ते सहा तास पुरेल असा इंटनेटचा रिचार्ज, बॅटरी बॅकअप, चांगले नेटवर्कची गरज आहे. ग्रामीण भागातल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे या सुविधा नाहीत. त्यामुळे इच्छा आणि गुणवत्ता असूनही गरीब आणि आदिवासी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार आहेत. ही बाब महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाने कला संचालनालयाच्या तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत बुधवारी उदय सामंत यांच्यासोबत आमदार कपिल पाटील, अभिजित वंजारी, मनिषा कायंदे यांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य कलासंचालयाचे संचालक आणि कला शिक्षक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कला शिक्षकांची बाजू ऐकल्यानंतर सामंत यांनी परीक्षा ऑनलाईनऐवजी ऑफलाईन घेण्याच्या सूचना कला संचालनालया दिल्या. तसेच या परीक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्यांवर एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करताना २०० रुपये शुल्क भरले आहे, अशा  विद्यार्थ्यांचे अतिरिक्त शुल्क परत देण्याचे आदेशही त्यांनी दिले. यासंदर्भात लवकरच अधिकृतरित्या परिपत्रक काढण्यात येईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ मुंबई उपनगरचे अध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा यांनी दिली.

Related posts

सीईटी सेलकडून आठ अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

बिरवाडी ग्रामपंचायतीच्या विरोधात दिव्यांगांचा एल्गार

Leave a Comment