मुंबई :
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषदेच्या माध्यमातून अथक परिश्रम घेऊन लिहिलेली भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. देशभरात दरवर्षी २६ नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. भारताची लोकशाही, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाने संविधान जागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सर्व सामान्य जनतेला आपल्या न्याय हक्कांची, संवैधानिक अधिकारांची व कर्तव्यांची जाणीव व्हावी यासाठी भारताचे संविधान त्यांना सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. लोकशाहीला व राष्ट्राच्या ऐक्याला मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्यावतीने संविधान वितरणाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.
अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळांमधील शिक्षकांना भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली. शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत घरोघरी भारतीय संविधान पोहोचवण्याच्या या उपक्रमाचे शिवसेना उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड यांनी स्वागत केले. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिल्यामुळे भारतीय संविधान लवकरच प्रत्येक घराघरात व मनामनात पोहचून लोकशाहीला व राष्ट्राच्या ऐक्याला मजबूत करून आपली लोकशाही समाजात रूजण्यास व बळकट होण्यास मदत होईल असा आत्मविश्वास शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी व्यक्त केले. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी भारतीय संविधान प्रत्येकाच्या मनात रुजविणचा निर्धार केला. या उपक्रमाअंतर्गत भारतीय संविधानाचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी होमी भाभा विज्ञान पुस्तकाचे लेखक श्रीनिवासन मयाना आणि सावित्रीबाई फुले पुरस्कार विजेते क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल उपस्थित होते.