मुंबई :
मुंबईतील गोवालिया टँक म्हणजेच ऑगस्ट क्रांती मैदान येथे सुमारे २०० वर्षांपूर्वी वाघाचे दर्शन झाले होते. या घटनेला ९ फेब्रुवारी २०२२ रोजी २०० वर्षे पूर्ण झाली आहेत. व्याघ्र दर्शनाला २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खाकी हेरिटेज फाउंडेशन, किड्स फॉर टायगर्स आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गोवालिया टँक येथे ९ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.
दक्षिण मुंबईत वाघ दिसल्याची शेवटची नोंद २०० वर्षांपूर्वी झाली. ९ फेब्रुवारी १८२२ रोजी मलबार हिलवरून हा वाघ खाली आला. त्याने गोवालिया टँक येथील तळ्यामध्ये आपली तहान भागवली. त्यानंतर तो हर्मिटेज आणि प्रोस्पेक्ट लॉजमध्ये असणार्या टेकडीच्या दिशेने निघून गेला. त्याच्या पायाचे ठसे दुसर्या दिवशी सकाळीही स्पष्ट दिसत होते. मुंबईतील विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी तसेच मुंबईतील प्राणी, पक्षी, कीटक आणि सागरी जीवसृष्टी आणि एकूणच निसर्ग, त्यातील विविध जीवघटक, त्यांचे परस्परांवर अवलंबून असलेले जीवित्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक आहे. त्यातूनच निसर्ग, पर्यावरण, आपल्यासोबत इतर घटकांचे सजीव सृष्टीतील अस्तित्व याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळेल, त्यातून निसर्गाविषयीच्या अभ्यासाची गोडी वाढेल, या उद्देशाने महानगरपालिका शाळेतील मुलांसाठी ‘वाघोबा क्लब’ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निरीक्षण केले. तसेच गोवालिया टँक येथे ठेवलेल्या वाघाच्या प्रतिकृतीचे त्यांनी अनावरण देखील केले.