मुंबई :
ठाणे ते दिवा दरम्यानचा पारसिक बोगदा हा उपनगरीय रेल्वे मार्गावर सर्वात लांब बोगदा समजला जातो. मात्र आता पारसिक बोगद्यापेक्षा लांब बोगदा पनवेल ते कर्जतदरम्यान बांधण्यात येत आहे. पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गावर तीन बोगदे तयार केले जाणार आहेत. यापैकी एक वावर्ले येथे २.६० किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) दिली आहेत.
सध्या पनवेल ते कर्जतदरम्यान एकच मार्ग असल्याने मेल, एक्सप्रेस आणि मालवाहतूक याच मार्गावरुन होते. कर्जत आणि पनवेलदरम्यानचा प्रवास नागरिकांना व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गाने लोकलने करावा लागतो. तसेच रस्ते मार्ग वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने पनवेल ते कर्जत थेट लोकल सुरु करण्याची मागणी होती. त्यासाठी एमयूटी ३ अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्ग हाती घेतला आहे. पनवेल-कर्जतदरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिकेला दोन हजार ७८३ कोटींचा अंदाजित खर्च येणार आहे. कोरोनामुळे या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे खोळंबली. जानेवारी २०२१ नंतर या कामांना सुरुवात झाली. २०२२ पर्यंत दुहेरी मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. दुहेरी मार्गाच्या कामासाठी सरकारी, खासगी आणि वन अशी १३५.८९३ हेक्टर जमीन आवश्यक असून, त्यातील १०१.०९० हेक्टर म्हणजेच ७४.३९ टक्के भूसंपादन झाले आहे.
पारसिक बोगद्याचा इतिहास
ठाणे शहराजवळील पारसिकाच्या डोंगरात खोदलेल्या या बोगद्याचे काम १९०६ साली सुरू करून १९१६ मध्ये पूर्ण झाले. हा बोगदा १.३ किमी लांबीचा आहे. एक किमीपेक्षा जास्त लांबीचा भारतीय रेल्वेवरील हा पहिला बोगदा होता आणि आशियातील तिसर्या क्रमांकाचा सर्वाधिक लांब बोगदा ठरला होता. यामुळे मुंबई ते कल्याणमधील अंतर ९.६ किमीने कमी झाले आहे.