मुंबई :
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात विविध मंत्रालये आणि विभागाकडून नाविन्यपूर्ण संकल्पनांसह चित्ररथ सादर केले जातात. भारतीय टपाल विभागाने यावर्षी रंगीबेरंगी चित्ररथाची रचना केली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीय टपाल विभागाने प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथातून विभागात कार्यरत, टपाल कार्यालयांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाप्रती कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.
महिला सक्षमीकरणाला प्राधान्य
‘भारतीय टपाल विभाग : महिला सशक्तीकरणाच्या निश्चयाची ७५ वर्षे’ ही टपाल विभागाच्या या वर्षीच्या चित्ररथाच्या देखाव्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. चित्ररथाच्या समोरच्या भागात, भारतीय पोस्ट पेमेंट बँक तसेच टपाल खात्यातील ५० टक्के खातेदार महिला आहेत. भारतीय टपाल विभागाचा आधुनिक चेहेरा आणि सशक्त संपर्क सेवा ठळकपणे दाखविण्यासाठी या चित्ररथात महिला कर्मचाऱ्यांमार्फत संचालित कार्यालये दर्शविण्यात आली आहे. चित्ररथावर तंत्रज्ञान आणि परंपरा यांचे मिश्रण असलेल्या टपाल विभागाच्या कार्याच्या कल्पनेसाठी आणि विभागाचा आधुनिक चेहेरा दाखवण्यासाठी एका हातात डिजिटल साहित्य आणि दुसऱ्या हातात पोस्टमनची पारंपरिक पिशवी असलेली पोस्टवूमन आहे. तिच्या बाजूला टपाल विभागावरील नागरिकांची अढळ श्रद्धा दर्शविणारी, सर्वत्र आढळणारी लाल टपाल पेटी उभी आहे. पोस्टवूमनच्या शेजारी पोस्टमनचे प्राथमिक रूप असलेला पूर्वीच्या काळातील डाकिया अथवा हरकारा उभारला आहे. काही काळापूर्वी संपलेल्या पंतप्रधानांना ७५ लाख पोस्टकार्डे अभियानाची देखील प्रतिमा येथे आहे.

सुकन्या समृद्धी योजने’वर भर
चित्ररथाच्या मागच्या भागात, पंतप्रधानांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाअंतर्गत सुरु केलेल्या ‘सुकन्या समृद्धी योजने’वर भर देणाऱ्या श्रीनगर येथील तरंगत्या टपाल कार्यालयाचा नमुना देखील ठेवण्यात आला आहे. टपाल कार्यालयाच्या त्रिमितीय टेबलांवर आपण ग्राहकांची आधार जोडणी, पोस्टल एटीएम सुविधा अशा सेवा देणाऱ्या टपाल विभागाच्या महिला अधिकाऱ्यांना बघितल्यावर टपाल विभागाच्या महिला सशक्तीकरणाप्रती असलेल्या निश्चयाची जाणीव होते. भारताच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक वारसा म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमारतींपैकी एक असलेली सर्वात जुनी, कोलकाता जीपीओ कार्यालयाची इमारतदेखील या चित्ररथात दिमाखाने उभी करण्यात आली आहे. चित्ररथाच्या खालच्या भागात, खादीच्या कापडावर छापलेल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित स्टँप्सचा कोलाज लावण्यात आला आहे. तो प्रजासत्ताक दिनानंतर विविध टपाल कार्यालयांमध्ये नागरिकांना पाहता येईल.
पोस्टमन आणि पोस्ट वुमनचे बसवले पुतळे
चित्ररथाचे वेगळेपण म्हणजे रथाच्या खालील भागात पोस्टमन आणि पोस्ट वुमनचे पुतळे बसवले आहेत. भारतीय टपाल विभागामध्ये फार पूर्वीच्या काळी असलेले हरकारे, त्यानंतर सायकलवरून घरोघरी जाणारे पोस्टमन आणि आता ई-बाईकवरून फिरणारे आधुनिक पोस्टमन अशा टपाल विभागाच्या प्रवासाचे प्रतीक म्हणून हे पुतळे बसविण्यात आले आहेत. भारतीय टपाल विभागाच्या या चित्ररथाची मध्यवर्ती संकल्पना आणि आरेखन टपाल विभागाचे सचिव विनीत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असून या कार्यात मुंबई विभागाच्या मुख्य पोस्ट मास्तर स्वाती पांडे आणि इतर काही अधिकाऱ्यांनी सर्जनशील सूचनांचे योगदान दिले आहे.