मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील विद्यानगरी परिसरातील नवीन ग्रंथालय इमारतीचे काम पूर्णत्वास आले आहे. काही किरकोळ कामे व ओसी प्राप्त होताच मार्च अखेरीस नवीन ग्रंथालयाची इमारत वापरासाठी खूली करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. लॉकडाऊनमुळे ग्रंथालय दुरूस्तीच्या कामात खंड पडला होता, मात्र आता पूर्ण क्षमतेने दुरुस्तीची कामे सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयातील पुस्तकांच्या सद्यस्थितीबाबत वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत मुंबई विद्यापीठाने ग्रंथालयाची नवीन इमारत मार्च अखेरीस सुरू करण्यात येईल असे सांगितले. मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची इमारत ही १९७५ रोजी बांधण्यात आली होती. या विद्यापीठ ग्रंथालयामध्ये ७ लाख ८० हजार एवढी ग्रंथ संपदा आहे. या ग्रंथालयात काही देणगीदारांनी त्यांच्याकडे जागा नसल्याने व त्यांच्या उपयोगाची नसलेली अनेक ग्रंथ, वर्तमानपत्रे देणगी म्हणून दिली होती. तसेच काही पुस्तके विक्री अभावीही मोठ्या प्रमाणात ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत. या ग्रंथालयातील अनेक पुस्तके ही जीर्ण आणि कालबाह्य झालेली आहेत. जीर्ण आणि कालबाह्य झालेली पुस्तके ही वेगळी करून रद्दबातल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच अनेक महत्वाच्या पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने रोबोटिक स्कॅनरद्वारे स्कॅन करण्याची प्रक्रिया लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असेही विद्यापीठाने म्हटले आहे.
सद्यस्थितीत ग्रंथालय इमारतीचे बांधकाम जुने असल्याने सुरक्षिततेच्या अनुषंगाने स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. टप्प्याटप्प्याने कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रथमतः ‘डी’ विंगचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असून तळमजला व पोटमाळा याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पहिल्या मजल्याचे काम मार्च २०२२ अखेरीस पूर्णत्वास येणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर व प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी वेळोवेळी या ग्रंथालयाच्या इमारतीला भेटी देऊन कामाची पाहणी केली आहे. तसेच विद्यापीठ अभियंता, संबंधित कंत्राटदारांना कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या वेळोवेळी सूचना दिल्या असल्याचे विद्यापीठाने प्रसिद्धी पत्रकातून स्पष्टीकरण केले आहे.