मुंबई :
कोकणातील ओसाड पडलेली शेती आणि त्यावर उपाय, शेती पूरक व्यवसाय, आरोग्य सुविधा, कोकण एज्युकेशनल अँकॅडमी आणि कोकणातील रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेकडून होणारा अन्याय अशा अनेक समस्या आणि पुढील विकासाबाबत कोंकण विकास समितीने गुरुवारी आमदार प्रसाद लाड यांची सायन सर्कल येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
कोंकण विकास समिती संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर, ॲड. प्रवीण शिंदे, सुरेश सरनोबत, ऋषिकेश मोरे यांनी आमदार प्रसाद लाड यांची भेट घेऊन चर्चा केली. कोकणातील ओसाड पडत असलेली शेती आणि त्यावर उपाय, शेती पूरक व्यवसाय या विषयांवर चर्चा करताना कोकणातील शेतकऱ्यांना कमी पाण्याचे प्रमाणातही चांगले उत्पन्न मिळवून देणारे बांबूचे उत्पादन करता येईल. सध्याच्या परिस्थितीत बांबूला खूप मागणी आहे. समितीचे सदस्य ॲड. प्रवीण शिंदे आणि त्यांचे सहकारी हे बांबू लागवडी संबंधात मार्गदर्शन करत असल्याचे लाड यांना सांगितल्यावर त्यांनी एक मोठा व्यावसायिक लाखो टन बांबू घेण्यास तयार असल्याचे सांगत त्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले.
कोकणातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये अद्ययावत करणे, तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणे, प्रशस्त लॅबची निर्माण करणे यावर चर्चा करताना कोकणमध्ये फिरती लॅबची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रसाद लाड यांनी मान्य केले.
कोकणातील विद्यार्थ्यांना आयएएस, आयपीएस, एनडीएसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी कोकण एज्युकेशनल अँकॅडमीची निर्मिती करावी, कोंकणातील बंद होत आलेल्या शाळा वाचतील अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षण मंडळाने आयसीएसई सीबीएसई धर्तीवर अभ्यासक्रम राबवावा. कोकणातील वादात्मक ७/१२ वर आणणारी २०- २५ नावे तसेच वादात्मक घर हक्क या विषयावरही सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.
कोंकण विकास समितीने मांडलेल्या या प्रश्नांवर प्रसाद लाड यांनी शासन स्तरावर सहकार्य करण्याचे स्पष्ट करून समितीच्या सदस्यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घडवून आणण्यात येईल, असे आश्वासनही दिले.