मुंबई :
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जची तस्करी करण्यात येते. मात्र बुधवारी अँटॉप हिल पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. अँटॉप हिल येथील कल्पक इस्टेट पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १६ किलो १०० ग्रॅम वजनाचे मेथॅक्युलॉन नावाच्या ड्रग्जचा साठा जप्त करत पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या.
मुंबई आणि उपनगरात काहीजण मेथॅक्युलॉन या ड्रग्जची विक्री करीत असून ते अँटॉप हिल परिसरात ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती युनिट एकच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या पथकाने कल्पक इस्टेट येथील एसएमडी रोडवरील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरजवळ सापळा रचला होता. बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता तिथे तपासणी केली असता त्यांच्याकडील प्लास्टिक बॅगेतून १६ किलो १०० ग्रॅम वजनाचे मेथॅक्युलॉन ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याच ड्रग्जची किंमत १६ कोटी १० लाख रुपये आहे. तिन्ही आरोपी अॅण्टॉप हिल परिसरात राहत असून त्यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान इक्बाल जालोरी, आसिफअली मोहम्मद अरब आणि अमजद हमीद खान अशी त्यांची नावे असून, त्यांनी हे ड्रग्ज कोठून आणले, त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची विक्री केली आहे का, त्यांचे अन्य सहकारी यांचा तपास पोलिस घेत आहेत.