- मुंबई
मुंबईतील अनेक पदपथ हे फेरीवाले व दुकानदारांनी काबीज केले आहेत. उर्वरित पदपथ हे चालण्यायोग्य नाही. पदपथांची झालेली दुर्दशा लक्षात घेत राज्याचे पर्यावरण, पर्यटन व पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने चेंबूर, महर्षी दयानंद सरस्वती मार्ग, चेंबूर स्टेशन ते डायमंड ग्राउंड येथील पदपथांचे सुशोभीकरण व सुधारणा करण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे.
चेंबूर, महर्षी दयानंद सरस्वती मार्ग, चेंबूर स्टेशन ते डायमंड ग्राउंड आणि वडाळा येथील लेडी जहांगीर रोड, सेंट जोसेफ सर्कल, वडाळा स्टेशन ते रुईया महाविद्यालयापर्यंतच्या पदपथाच्या कामाचे प्रस्ताव मंजूर झाल्यावर आणि कार्यादेश प्राप्त झाल्यावर किमान १५ महिन्यांत करण्यात काम पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी पालिकेने जेव्हा टेंडर मागवले त्यावेळी १४ कंत्राटदारानी टेंडर प्रक्रियेत भाग घेतला. मात्र मे. पियुष एन्टरप्रायजेसने २३.२१ टक्के कमी दरात म्हणजे ३२ कोटी ४ लाख १ हजार २८२ एवढ्या किमतीत अधिक इतर खर्च असे एकूण ४३ कोटी ५५ लाख रुपयांचे टेंडर भरत कामाची तयारी दर्शवली. हे काम पूर्ण झाल्यावर पादचार्यांना चांगले पदपथ चालण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र कमी किमतीमध्ये कंत्राट दिल्याने कामाच्या दर्जाबाबत विरोधकांकडून व पहारेकरी भाजपकडून शंका उपस्थित केली जाऊ शकते.