मुंबई :
सार्वजनिक आरोग्य विभाग व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ‘महिला आरोग्य तपासणी मोहीम’ राबविण्यात येत आहे. सर्व जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण तथा स्त्री रुग्णालयात महिलांचा रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयमुखाचा कर्करोग तसेच हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येणार आहे.
किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळी संदर्भातील समस्या याबाबत समुपदेशन केले जाईल. यंदाच्या महिला दिनाची संकल्पना ही ‘शाश्वत उद्यासाठी आज स्त्री-पुरुष समानता समाजात रुजली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी आपणच प्रयत्नशील राहूया’ अशी आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम राज्य आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे या कालावधीत प्रत्येक आरोग्य संस्था व उपकेंद्रामध्ये कम्युनिटी बेस्ड अॅक्टिव्हिटी शिबिर घेऊन महिला व मुलींना विटामिन कमतरता दूर करण्यासंदर्भात मोफत औषधे वाटप, गर्भवती महिलांमध्ये हिरड्यांचे विकार व गरोदरपणातील मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास आढळून येतो. त्यामुळे अन्न पोषण योग्य प्रमाणात होऊ शकत नाही, याबाबत योग्य उपचार व समुपदेशन केले जाणार आहे, त्यामुळे या शिबिरांमध्ये महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.