मुंबई :
जगातील भूगर्भीय बदलांवर कलात्मकरित्या प्रकाश टाकण्याचे काम गिरणगावातील मेटल वर्क आर्टिस्ट स्वप्निल गोडसे याने केले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत २१ डिसेंबरला सुरु झालेल्या ‘दगड’ या प्रदर्शनात लोखंडासह स्टील आणि तांबे या धातूंच्या मदतीने त्याने विविध कलाकृतींमधून भूगर्भीय बदल आणि मानवी स्वभागाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. सुप्रसिद्ध कलावंत प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. २७ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत नागरिकांना प्रदर्शन मोफत पाहता येणार आहे.
प्रदर्शनाच्या उद्घटनावेळी राजेशिर्के म्हणाले की, इतर कलावंतांहून वेगळे काहीतरी करण्याचे प्रयत्न स्वप्निलने साकारलेल्या कलाकृतीत केल्याचे स्पष्ट दिसते. आपण प्रवासात असताना वेगवेगळ्या प्रकारचे दगड, डोंगर पाहतो. अनेकवेळा दरडीच्या रुपात मोठ-मोठे दगड रस्त्यावर कोसळतात. रस्त्याच्या रुंदीकरणातही वेगवेगळ्या आकाराचे दगड आपण पाहतो. या प्रत्येक कामात दगडाची भूमिका आणि महत्त्व वेगवेगळे आहे. यामधील प्रत्येक दगड हा बोलका वाटतो. या दगडामधील जीवसृष्टीचे चिंतन आणि मनन करून त्यामागील सौंदर्य दृष्टी स्वप्निलने त्याच्या कलाकृतीतून मांडली आहे. दुचाकी गाडी किंवा चारचाकी माल वाहतूक वाहनामधून खाली होणाऱ्या दगडाचा प्रवासही त्याने न्याहाळल्याचे प्रदर्शनात दिसते. प्रत्येक दगडाला एक आकार आहे, रंग आहे, खाचखळगे आहेत, पोत (टेक्चर) आहे. या सगळ्यांची सांगड घालताना सर्व दगड हे त्रिकोणी आकृतीमध्ये दिसतात. मानवी अंग मांडताना मांडी घालून ध्यानस्त बसलेला जीवही त्रिकोणीच दिसतो. अशाप्रकारे दगडामधील परिवर्तन मानवी जीवनातील परिवर्तनाशी जोडण्याचा खूप सुंदर आणि वेगळा प्रयत्न स्वप्निलने प्रदर्शनात केल्याचे राजेशिर्के यांनी स्पष्ट केले.
यावेळी ख्यातनाम आर्किटेक्ट कुणाल मनियार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, स्वप्निलने साकारलेल्या प्रत्येक कलाकृतीमधून निसर्गातील बारीकसारिक कृतींवरही प्रकाश टाकला आहे. दगडावर उगवलेले छोडेस झाड हे सुद्धा निसर्गातील बदल आणि भावनांना प्रदर्शित करते. दगड ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक परिस्थितीत त्या-त्या ठिकाणचा एक वेगळा रंग आणि आकार घेत असते. दगडाप्रमाणेच वेगवेगळ्या वातावरणात माणसाची जडणघडणही तेथील परिस्थितीनुसार बदलत असते. एकूणच प्रदर्शनाचे नाव ‘दगड’ असले, तरी दगडाच्या जडणघडणीचा संबंधि निसर्गाशी जोडताना त्यातून मानवी स्वभावाचे दर्शन करण्याचा समतोल या प्रदर्शनातून साधण्यात स्वप्निल यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
प्रेक्षकांना पडतेय रिक्षाची भुरळ
दगडाचा प्रवास दाखवताना स्वप्निलने साकारलेली धातूची रिक्षा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक हे रिक्षासमोर उभे राहू सेल्फी घेताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रदर्शनात या रिक्षाची सर्वाधिक भुरळ पडल्याचे दिसते.
