मुंबई :
विद्यार्थी, कर्मचारी यांच्या विविध समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चाप लावला जातो. सिनेट सदस्य विविध मुद्दे स्थगन प्रस्तावाद्वारे अधिसभेत (सिनेट) मांडून प्रशासनावर अंकुश ठेवतात. सिनेट सदस्यांच्या हातातील हे ब्रह्मास्त्रच कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्याकडून निकामी करण्याची योजना राबवली जात आहे. स्थगन प्रस्ताव घाईघाईत आटोपते घेणे, थातुरमातूर आश्वासन देऊन सदस्यांना मागे घेण्यास भाग पाडणे, वेळेचे कारण देत स्थगन मांडण्यास पुरेसा वेळ न देणे असे प्रकार कुलगुरूंकडून राबवण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याकडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर सिनेट सदस्य स्थगन प्रस्ताव या आयुधाचा वापर करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतात. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या कारभारावर अंकुश ठेवण्यामध्येही स्थगन प्रस्ताव महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र विद्यापीठाच्या सिनेटमध्ये सदस्यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेत आजवर विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. परंतु मागील काही सिनेटमध्ये कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर हे स्थगन प्रस्ताव कसा टाळता येईल याकडेच अधिक लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. सिनेटच्या कामकाजामध्ये स्थगन प्रस्तावांना पुरेसा वेळ मिळणार नाही याची काळजी घेणे, एक ते दोन मिनिटांमध्ये प्रस्ताव संपावण्यास सदस्यांना भाग पाडत आहेत. समस्या दूर करण्याचे आश्वासन देऊन प्रस्तावच मागे घेण्यास सांगणे, असे प्रकार राबवले जात आहेत. सिनेटमध्ये सर्व विषय मंजूर झाल्यानंतर कुलगुरूंकडून स्थगन प्रस्तावास वेळ दिला जातो. सर्व विषय मंजूर झाल्यानंतर सभागृह स्थगित करून काहीच साध्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न अनुत्तरीत राहतात. ही बाब विद्यापीठाचा आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने धोकादायक आहे. आपला कार्यकाळ विनाअडथळा संपावा आणि कोणत्याही समस्येला आपल्याला सामोरे जावे लागू नये यासाठी कुलगुरूंकडून स्थगन प्रस्ताव गुंडाळण्याची रणनीती राबवण्यात येत आहे. मात्र ही रणनीती विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा आरोप सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी कुलगुरूंना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
स्थगन प्रस्ताव मांडताना कुलगुरूंकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अद्यापपर्यंत एकही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. कुलगुरू आश्वासन देऊन फक्त सदस्यांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. त्यामुळे स्थगन हे आयुध कुचकामी करण्याचा कुलगुरूंचा प्रयत्न असल्याचा आरोप सिनेट सदस्य शीतल शेठ देवरुखकर यांनी करत अॅड. वैभव थोरात यांच्या पत्राला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे सिनेटच्या सुरुवातीलाच स्थगन प्रस्ताव घेतल्यास विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लागण्यास मदत होईल. येत्या सिनेटमध्ये स्थगन प्रस्ताव सुरुवातील घेण्याबाबत आमची आग्रही भूमिका असल्याचे सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहचाडे यांनी सांगितले.
विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे. त्यांचे प्रश्न मांडण्यास पुरेसा वेळ मिळायला हवा. वेळ मारून नेण्यासाठी आश्वासने न देता प्रामाणिकपणे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जावेत. येत्या अधिसभेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्थगन प्रस्तावास पुरेसा वेळ देण्यात यावा.
– ऍड. वैभव थोरात, युवासेना सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ