मुंबई :
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत ओव्हरियन म्हणजेच अंडाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रजोनिवृत्तीचे वय उलटून गेलेल्या महिलांना हा आजार होण्याची दाट शक्यता असून, भारतातील महिलांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये अंडाशयाचा कर्करोग तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात या आजाराचे प्रमाण जवळपास ६.७ टक्के असून कर्करोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास ३.८ टक्के मृत्यू या आजारामुळे होतात. दरवर्षी आपल्या देशामध्ये अंडाशयाच्या कर्करोगाच्या जवळपास ४५ हजार नव्या केसेस आढळून येतात.
अंडाशयाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे दिसून येत नसल्याने याला “सायलेंट” किलर म्हटले जाते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आधी हा आजार झालेला असणे, आनुवंशिकता, वय, वजन, एन्डोमेट्रियोसिस (जेव्हा एन्डोमेट्रियल पेशी गर्भाशयाच्या व्यतिरिक्त अंड नलिका, अंडाशय किंवा काही दूरच्या अवयवांमध्ये वाढतात), मासिक पाळी लवकर येऊ लागणे, रजोनिवृत्ती उशिरा होणे, गर्भधारणा खूप उशिरा होणे किंवा गर्भधारणा न होणे असे अनेक बाबी अंडाशयाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरतात.
५० वर्षे वय उलटून गेलेल्या महिलेला हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. “कुटुंबामध्ये आधी एखाद्या व्यक्तीला म्हणजे आई, बहीण किंवा अगदी जवळच्या नातेवाईक स्त्रीला स्तनाचा कर्करोग किंवा अंडाशयाचा कर्करोग झालेला असल्यास त्याच कुटुंबातील इतर स्त्रियांना अंडाशयाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. अंडाशयाच्या कर्करोगाच्या जवळपास १० ते २० टक्के केसेस या बीआरसीए १ किंवा बीआरसीए २ जीन म्युटेशनमुळे होतात. अंडाशयाचा कर्करोगाचे निदान करण्यात आलेल्या प्रत्येक महिलेसाठी जेनेटिक तपासणी करवून घेणे आवश्यक असल्याचे लीलावती हॉस्पिटलमधील वरिष्ठ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. भावना पारीख यांनी सांगितले.
अंडाशयाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असताना त्याची लक्षणे लक्षात येणे कठीण असते. पोट फुगणे, ओटीपोटात दुखणे किंवा पोट भरलेले असल्यासारखे वाटणे, पाठदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, वारंवार लघवी होणे, मासिक पाळी अनियमित असणे, योनीतून स्त्राव येणे अशी काही लक्षणे आहेत पण हीच लक्षणे इतर काही आजारांमध्ये देखील उदभवू शकतात.
आजार कोणत्या टप्प्यावर आहे त्यावर उपचारांमुळे मिळणारे परिणाम अवलंबून असतात. रुग्ण सरासरी ५ वर्षे जगण्याची शक्यता ४९% असते. आधीच्या टप्प्यामध्ये आजार लक्षात आल्यास रुग्ण पुढील पाच वर्षे जगण्याची शक्यता ९३% असते आणि आजार जागच्या जागी आहे पण पुढील टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे अशा केसेसमध्ये ही शक्यता जवळपास ७५% असते. आजार खूप पुढच्या टप्प्यामध्ये पोहोचलेल्या केसेसमध्ये रुग्ण पुढील पाच वर्षे जगण्याची शक्यता ३०% असते. आजाराचे निदान जेव्हा करण्यात आले तेव्हा ६५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांची स्थिती ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांपेक्षा अधिक चांगली असते, अशी माहिती डॉ. पारीख यांनी दिली.
जेव्हा-जेव्हा हे त्रास औषधांमुळे बरे होत नाहीत तेव्हा अजिबात वेळ न दवडता, तात्काळ एखाद्या ऑन्कॉलॉजिस्ट किंवा डॉक्टरचा सल्ला घ्यावा. या कर्करोगाच्या पुढील टप्प्यामध्ये त्या स्त्रीला वजन कमी होणे, श्वास घेण्यात अडथळा होणे अशी देखील लक्षणे दिसून येऊ शकतात.
– डॉ. भावना पारीख, वरिष्ठ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, लीलावती हॉस्पिटल