मुंबई :
मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार्या यंदाच्या आयपीएल सामन्यावर घातपात घडविण्याचा कुठलाही कट असल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले नाही असा खुलासा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे. घातपात होणार असल्याची कुठलीही माहिती गुप्तचर विभागाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आली नाही. त्यामुळे नियोजित वेळेनुसार आयपीएलचे सामने होणार असून त्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
२६ मार्चपासून आयपीएलचे सामने होणार असून त्यातील काही सामने मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. यंदाच्या आयपीएलवर सामन्यावर घातपात घडविण्यासाठी काही अतिरेकी संघटना सक्रिय झाल्याचे वृत्त होते. मात्र या वृत्ताचे मुंबई पोलिसांकडून खंडन करण्यात आले आहे. मुंबईत वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयपीएलचे बहुतांश सामने होणार आहे. त्यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. सामन्यासाठी मैदानावर तसेच क्रिकेटपट्टू वास्तव्यास असलेल्या हॉटेल ट्रायटेडवर पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अतिरेक्यांकडून हॉटेल ट्रायटेड, वानखेडे स्टेडियम तसेच हॉटेल ट्रायडेंट ते वानखेडे स्टेडियमदरम्यानच्या मार्गाची रेकी झाल्याची कुठलीही माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाने मुंबई पोलिसांना प्राप्त झालेली नाही. मात्र मुंबई पोलिसांनी आपल्या परिने योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दोन्ही स्टेडियमसह हॉटेल ट्रायडेंटवर पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कुठलीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याची दक्षता घेण्यात आली आहे. अतिरेकी हल्ल्यांचे वृत्त पूर्णपणे बोगस असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.