मुंबई :
कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे तिसर्या लाटेदरम्यान अन्य रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून राज्यातील रक्तपेढ्यांना पुरेसा रक्तसाठा उपलब्ध ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा आहे. मात्र निर्बंध कठोर होत असल्याने पुढील काळामध्ये अन्य रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या गरजेप्रमाणे रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा ठेवण्यासंदर्भात परिषदेने राज्यातील रक्तपेढ्यांच्या रक्तप्रमुखांना निर्देश दिले आहेत. यामध्ये गर्दी टाळून सामाजिक सुरक्षा व इतर नियमांचे पालन करून गरजेनुसार लहान लहान प्रमाणात स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. या शिबिरांचे आयोजन करण्यासाठी स्थानिक स्तरावर महसूल व पोलिस प्राधिकरणातील अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांना रक्तदान शिबिराची गरज पटवून द्यावी. जेणेकरून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात अडचणी येणार नाहीत. तसेच रक्त संकलन वाढवण्यासाठी नियमित रक्तदात्यांशी संपर्क करावा, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. त्यासाठी रक्त संकलन वाहनासह रक्त संकलन पथक पाठवण्यात यावे अशा सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ज्या रक्तपेढीमध्ये जादा रक्त असेल त्या रक्तपेढीतील रक्त दुसर्या रक्तपेढीमध्ये पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्याचप्रमाणे नियमित रक्त संक्रमण करावे लागणार्या थॅलेसेमिया रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. साधना तायडे यांनी दिले आहेत.
सध्या राज्यामध्ये पुरेसा रक्तसाठा असून, पुढील आठ ते दहा दिवस पुरेल इतका आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये लागू करण्यात येत असलेल्या कठोर निर्बंधामुळे पुढील काळामध्ये रक्तसंकलन करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे राज्यातील रक्तपेढ्यांना रक्तसंकलन करण्याचे आदेश दिले आहेत.
– डॉ. अरुण थोरात, संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद